1 जानेवारी ते 24 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील 19 लाख 97 हजार 116 संशयितांमध्ये एक लाख 41 हजार 398 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यातील तीन हजार 34 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
सोलापूर: कोरोनाची दुसरी लाट ओसरली, प्रतिबंधित लसीकरणही सुरु आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवलेली असतानाही विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी वाढू लागली आहे. वारंवार नियम पाळण्याचे आवाहन करूनही बेशिस्तपणा कमी झालेला नाही. 1 जानेवारी ते 24 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील 19 लाख 97 हजार 116 संशयितांमध्ये एक लाख 41 हजार 398 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यातील तीन हजार 34 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
कोरोना रुग्णांसह बळीची संख्या वाढू लागल्यानंतर शहर-ग्रामीणमधील रुग्णालयांमध्ये अक्षरश: रुग्णांना वेळेवर खाटा मिळाल्या नाहीत. ऑक्सिजनसाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाला ताण काढावा लागला. त्यावेळी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे सातत्याने आवाहन करण्यात आले. तरीही, बहुतेक नागरिकांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि त्यांना कोरोनाची बाधा झाली. 1 जानेवारीला शहरातील रुग्णसंख्या 11 हजार 66 होती तर ग्रामीणमधील रुग्णसंख्या 38 हजार 197 होती. मात्र, ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. कोरोना आटोक्यात आला म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या प्रशासनाने मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
24 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 18 हजाराने तर ग्रामीणमध्ये एक लाख 23 हजार 330 रुग्ण वाढले. तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन प्रशासनाने आता ऑक्सिजन साठवण क्षमता आणि ऑक्सिजन निर्मितीचे पाऊल उचलले. दरम्यान, तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका 18 वर्षांखालील मुलांना असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर त्यांच्यासाठी बेड्सही राखीव ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली. मात्र, तिसरी लाट येऊ नये, म्हणून सध्या वाढत असलेली रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना दिसत नाहीत.
2021 मधील रुग्णवाढ (1 जानेवारी ते 24 ऑगस्टपर्यंत)
शहरातील स्थिती
- कोरोना चाचण्या- 3,19,400
- पॉझिटिव्ह रुग्ण- 18,068
- कोरोनाचे बळी- 844
ग्रामीणमधील स्थिती
- एकूण कोरोना टेस्ट- 16,77,716
- पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण- 1,23,330
- कोरोनामुळे मृत्यू- 2,190
दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचेच बळी
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक बाधित झाले आणि त्यात त्यांना जीव गमवावा लागला. दुसऱ्या लाटेतही तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकच कोरोनाचे बळी ठरत आहेत. मागील काही दिवसांत ग्रामीणमधील मृतांचे प्रमाण वाढले आहे. 1 ते 24 ऑगस्ट या काळात ग्रामीणमध्ये 13 हजार 127 रुग्ण वाढले आहेत. चिंतेची बाब म्हणजे कोरोनाची लाट ओसरलेली असतानाही, दवाखान्यांमध्ये मुबलक खाटा शिल्लक असतानाही ऑगस्टमध्ये 185 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक
कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहरात आतापर्यंत 29 हजार 134 तर ग्रामीणमध्ये एक लाख 61 हजार 527 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये काहीजणांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. परंतु, कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, हे विशेष. तर जिल्हाभरातील एकूण एक लाख 90 हजार 661 रुग्णांपैकी एक लाख 82 हजार 84 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, लसीकरणही जोरात सुरु आहे. तरीही, नागरिकांनी कोरोना होणार नाही, कोरोना संपला, असा समज करू नये, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.