पंढरपूर - उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यात आज (शनिवारी) आणखी वाढ करण्यात आली. शनिवारी सायंकाळी उजनी धरणातून ६१ हजार ६०० क्सुसेक तर वीर धरणातून ३३ हजार ६५९ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. आज सायंकाळी पंढरपूर येथील नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्याने नदीकाठच्या व्यासनाराय़ण झोपडपट्टीसह लगतच्या लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या.
वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून आज (ता. १३) सायंकाळी पाच वाजता वीर धरणातून नीरा नदी पात्रात ३३ हजार ६५९ क्युसेक्स तर उजनीतून ६१ हजार ६०० क्सुसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत होते. त्यावेळी पंढरपूर येथील भीमा नदी ५४ हजार ७०२ क्युसेकने वाहत होती.
पंढरपूर येथे भीमा नदीपात्रात १ लाख १५ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर पाणी पातळी ४४३.६०० मी. इतकी होते. त्यावेळी नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. १ लाख ३८ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर पाणी पातळी ४४३.६०० मीटर होते आणि गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. १ लाख ७० हजार क्युसेक विसर्ग आल्यावर पाणीपातळी ४४५.५०० मीटर होते आणि संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते तर १ लाख ९७ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर पाणीपातळी ४४६.३०० मीटर होते आणि गोविंदपुरा येथे पाणी येते. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यात वाढ करण्यात येत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
संभाव्य पूरपरस्थितीवर मात करण्यासाठी तसेच जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून चंद्रभागा नदीत दोन बोटीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेवून तालुक्यात गावपातळीवर तसेच पंढरपूर शहरात आपत्ती निवारणार्थ यंत्रणा गतिमान केली आहे. यापूर्वीच्या आपत्ती धोक्याचा अभ्यास करुन त्या ठिकाणी आवश्यकती खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच नदीवर चार पूल असून त्यापैकी दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. नदी काठावरील नागरिकांनी व पंढरपूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. तसेच आपत्तीकालिन परिस्थिचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचेही प्रांताधिकारी श्री. गुरव यांनी सांगितले.
चंद्रभागा नदीपात्रात भाविकांनी व नागरिकांनी जावू नये तसेच होडी चालकांनी नदीपात्रात होडी घेवून जावू नये यासाठी ध्वनीक्षेपकाव्दारे वेळोवळी सूचनाही प्रशानकडून देण्यात येत आहेत. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी व भाविकांनी पालन करावे, असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना
चंद्रभागा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापनातंर्गत महसूल व नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चंद्रभागा नदीत दोन रबरी मोटार बोटीची व्यवस्था करण्यात आली असून, लाइफ जॅकेटस्, फ्लोटींग रिंग, रोप, सर्च लाईट, ध्वनीक्षेपक, रेस्क्यू किट इत्यादी साहित्य उपलब्ध करण्यात आले असून चंद्रभागानदी काठावरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सूचना दिल्याच्या तहसीलदार सुशील बेल्हेकर व मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.