सोलापूर : आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना आता १२ ते १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. बदलीसाठी पात्र शिक्षकांसाठी जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. तत्पूर्वी, ‘आंतरजिल्हा बदलीसाठी ‘ग्रामविकास’कडून तोंडी मुदत’ असे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते.
त्यानंतर ग्रामविकास विभागाने पहिल्या आदेशात शुद्धिपत्रक काढून आंतरजिल्हा बदलीचे अर्ज करण्यासाठी आता शिक्षकांना १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शिक्षण विभागाच्या २१ जून २०२३ रोजीच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्तरावर आंतरजिल्हा बदली ऑफलाइन पध्दतीने करण्याचे आदेश दिले होते.
परंतु, काही शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा देत हा आदेश रद्दची मागणी केली. त्यानंतर आंतरजिल्हा बदल्या पूर्वीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय झाला. ग्रामविकास विभागाने ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ या काळात आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची दिली होती.
ही मुदत संपली, पण शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टल उपलब्धच झाले नाही. त्यानंतर ग्रामविकास विभागाने १२ ते १५ डिसेंबरर्पंत मुदत असल्याचे तोंडी सांगितले. आदेश नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम होता. ‘सकाळ’ने त्यावर वृत्त प्रकाशित करताच ग्रामविकास विभागाने पूर्वीच्या आदेशासंदर्भात शुद्धीपत्रक काढले. त्यानुसार शिक्षकांना १२ ते १५ डिसेंबर या काळात आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येणार आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://ott.mahardd.com हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सर्व सूचना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
शिक्षक सहकार संघटनेने राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याला आज यश आले. आंतरजिल्हा बदलीच प्रकियेचे वेळापत्रक जाहीर केल्याबद्दल ‘दै. सकाळ’सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार परिणय फुके यांचे आभार. जुने फॉर्म एडीट करताना संवर्ग बदलण्याची संधी देऊन साखळी बदल्या करूनच ही प्रक्रिया पूर्ण करावी.
- निलेश देशमुख, राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना, महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.