सांगोला - सांगोला तालुक्यातील वंचित 12 गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतिक्षित स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला सोमवारी (ता. 5) रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राला या योजनेचे पाणी मिळणार असून यासाठी ८८३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याची माहिती मुंबईहून आमदार शहाजी पाटील यांनी दिली.
सन १९९७ मध्ये मूळ मंजूर असलेली ७३.५९ कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला सन २००० साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी १६ हजार एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते परंतु सन २००० ते २०१९ या काळामध्ये सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरी नंतर पाच वर्षांनी सन २००६ साली याची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली.
आमदार झाल्यानंतर शहाजी पाटील यांनी सन २०२० सालापासून या कामाचा पाठपुरावा केला व नव्याने १२ वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला.
योजना पूर्ण करण्यासाठी ८८३ कोटी इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली असून काल सोमवारी (ता. 5) रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.
कार्यकर्त्यांनी केला जलौष -
बातमी समजताच शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून शहरातील मुख्य चौकांमध्ये फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.
स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना असे झाले नामकरण -
आमदार शहाजी पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून १७ नोव्हेंबर 2022 मध्ये या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण करण्यात आलेल्या या योजनेतून दीड टीएमसी पाणी बंदीस्त वितरण नलिकेतून लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, य. मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी व इटकी या 12 गावांना सुमारे 33 हजार एकर क्षेत्राला व अर्धा टीएमसी पाण्यातून सांगोला शाखा कालवा 5 वरील सुमारे 6 हजार एकर असे एकूण 39 हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार असल्याने दुष्काळी सांगोला तालुका ही ओळख कायमस्वरूपी पुसली जाणार आहे.
निवडणुकीमध्ये दिलेला शब्द मी खरा केला असून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या पुढील काळामध्ये पाणी या विषयावर कोणतीही निवडणूक अथवा राजकारण होणार नसल्याची ग्वाही आमदार शहाजी पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.