कोरवली (सोलापूर) : पोलिस हे नाव उच्चारताच सर्वसामान्य नागरिकांना घाम फुटायला लागतो... कोण पोलिसांच्या वाटेवर जाणार..! त्यांच्यापासून दोन हात दूर राहिलेले बरे..! असे म्हणत अनेकजण पोलिस ठाण्याची पायरीही चढण्याचे टाळतात. पोलिस म्हणजे रुबाबदार, दरारा, गुंडांना झोडपून काढणारे ! मग त्यांच्यापुढे आपला काय टिकाव लागणार, असा सर्वसामान्यांचा समज झाला आहे. वाईट काम करायचे नाही आणि पोलिसांना घरापर्यंत येऊ द्यायचे नाही, असा चांगल्या लोकांचा प्रयत्न असतो. मात्र खाकी वर्दीतही चांगली माणसे असतात, याचा विसर सामान्य नागरिकांना पडत आहे. पोलिसांच्या माणुसकीचे उदाहरण सोलापूर- मंगळवेढा रोडवर बेगमपूर गावाजवळ झालेल्या एका अपघाताप्रसंगी पाहायला मिळाले.
डॉ. सिंगमित्रा मेळकोंडे हे आपल्या चारचाकी गाडीतून कोल्हापूरहून बिदरला निघाले होते. शुक्रवारी (ता. 26) दुपारी दोन वाजता सोलापूर- मंगळवेढा रोडवर बेगमपूर नजीक डॉ. सिंगमित्रा मेळकोंडे यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यावरून उलटली. यामध्ये डॉ. सिंगमित्रा यांना मोठी इजा झाली व ते बेशुद्धावस्थेत पडले होते, अशी माहिती कामती पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक व बेगमपूर बीटचे अंमलदार जाधवर यांना समजली. तेव्हा जाधवर हे बेगमपूर येथे कोरोना बंदोबस्त ड्यूटीवर होते. त्यांना अपघाताची माहिती समजताच जाधवर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अपघाताच्या ठिकाणी डॉ. सिंगमित्रा हे उन्हात बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाचा खूप तडाखा होता. हे पाहून जाधवर यांनी स्वतः कपडा आणून सावलीची सोय केली.
ऍम्ब्युलन्स येण्यासाठी एक तास लागला. तोपर्यंत पोलिस कॉन्स्टेबल पाटील, पोलिस नाईक जाधवर आणि होमगार्ड वाघमोडे यांनी एक तास भर उन्हात उभे राहून जखमी डॉक्टराला कापडाची सावली दिली. त्यांच्या प्रयत्नामुळे एका डॉक्टराचा जीव वाचला. हे सर्व दृश्य पाहून रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांना देखील गहिवरून येत होते. त्यांच्या या माणुसकीच्या सत्कार्याबद्दल कामती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
पोलिस म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात उभी राहते, ती खाकी वर्दीतील तापट स्वभावाची, कडक शब्दांत बोलणारी, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्तीची प्रतिमा. त्यामुळे पोलिसांबद्दल अनेकांच्या मनात भीती असते. असा हा पोलिस कर्तव्याच्या वेळी जितका कठोर असतो, तितकाच वेळप्रसंगी मनानेही मृदू असतो, याचा प्रत्यय या प्रसंगाने आला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.