चिखलठाण : कुगाव (ता. करमाळा) येथील उजनी जलाशयातील इनामदार वाडा पूर्णपणे उघडा झाल्याने या ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहे. उजनी धरणातील जलविहार, नौकानयनाचा आनंद व या ऐतिहासिक किल्ल्याची सहल करण्यासाठी दूरवरून लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत.
उजनी धरणाची पाणी पातळी वजा ५५ टक्क्यांपर्यंत गेल्याने उजनी धरणात असलेला कुगाव येथील प्रसिद्ध इनामदार वाडा पूर्णपणे उघडा झाला असून या ठिकाणी करमाळा तालुक्यातील जेऊरवरून कुगाव येथून व इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून दररोज अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीत उजनी धरण परिसरातील कोटलिंग मंदिर व कुगाव येथील ऐतिहासिक इनामदार वाडा व परिसरातील इतर ठिकाणाला भेट देऊन उजनी धरणातील पाण्यात नौकानयनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक शालेय मुले व नोकरदार मंडळी येत आहेत.
करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या सैराट या चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी केले होते. हा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर हे ठिकाण पाहण्यासाठी अनेक मंडळी दूरवरून येत होती.
सैराट चित्रपटामुळे या वाड्याला प्रसिद्धी मिळाली असली तरी धरणाच्या मध्यभागी असणाऱ्या या इनामदार वाड्याला मोठा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचा उत्तम प्रशासक म्हणून लौकिक होता.
त्यांनी आपल्या कामगिरीने निजामाचा विश्वास संपादन केला. त्यांची जहागिरी असलेल्या इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बंदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीराजेंवर सोपवली होती. मालोजीराजे भोसले यांनी हनुमानाचे जन्मस्थान असणाऱ्या भीमा नदी काठच्या कुर्मग्राम (कुगाव) या ठिकाणी सैन्यांना रसद मिळण्यासाठी मदत व्हावी म्हणून एक किल्ला बांधला.
हाच किल्ला पुढे इनामात १८९३ साली यशवंत मेघश्याम इनामदार यांच्याकडे देण्यात आला. आता या किल्ल्याला इनामदार वाडा से संबोधले जाते. सध्या हा किल्ला उजनी बॅकवॉटर परिसरातील पाणी उथळ झाल्याने उघडा पडायला लागला आहे. फक्त उन्हाळ्यातच हा किल्ला उघडा पडत असल्यामुळे मावळे, हनुमान भक्त, पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.
करमाळा तालुक्यातील पुणे- सोलापूर रेल्वे मार्गावरील रेल्वे स्टेशन व अहमदनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या जेऊर या गावापासून पश्चिम दिशेला शेटफळ, चिखलठाणमार्गे पंधरा किलोमीटर अंतरावर हा इनामदार वाडा आहे.
तर पुणे-सोलापूर महामार्गावरील वरकुटे पाटी व इंदापूर या ठिकाणावरून कळाशी या गावाला जाता येते. कुगाव व कळाशी या दोन्ही गावावरून इनामदार वाड्याकडे जाण्यासाठी दिवसभर यांत्रिक बोटीची व्यवस्था आहे.
उजनी जलाशयातील प्रसिद्ध इनामदार वाड्याकडे अनेक पर्यटक दररोज येत आहेत. एक दिवसाच्या सहलीसाठी हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणी आल्यानंतर करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील प्रसिद्ध कोटलिंग मंदिर, हनुमान जन्मभूमी असलेले कुगाव येथील हनुमान मंदिर, जिवंत नागाची पूजा करणाऱ्या शेटफळ गावातील प्राचीन नागोबा मंदिरालाही भेट देता येते. दहा किलोमीटरच्या अंतरामध्येच ही सर्व ठिकाणी असल्याने दिवसभरात या सर्व ठिकाणी जाता येते.
- सचिन धारक, चिखलठाण, ता. करमाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.