Water Distribution : कर्नाटकात समान पाणी वितरणासाठी स्काडाप्रणालीचा यशस्वी प्रयोग

गेल्‍या काही वर्षांत कृषी सिंचनाच्‍या क्षेत्रात कर्नाटकने कात टाकली आहे. आता कालव्‍याद्वारे पाणी वाटपासाठी स्‍काडा ॲटोमॅटिक सिस्‍टीमचा वापर करीत शेतकऱ्यांच्या दृष्‍टीने क्रांतिकारी पाऊल टाकले आहे.
Scada Process
Scada Processsakal
Updated on

सोलापूर - गेल्‍या काही वर्षांत कृषी सिंचनाच्‍या क्षेत्रात कर्नाटकने कात टाकली आहे. आता कालव्‍याद्वारे पाणी वाटपासाठी स्‍काडा ॲटोमॅटिक सिस्‍टीमचा वापर करीत शेतकऱ्यांच्या दृष्‍टीने क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या यंत्रणेतील सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण कालवा क्षेत्रावर पाटबंधारे प्रशासनाला नजर ठेवता येत आहे. नियंत्रण कक्षातूनच कालव्‍याचे गेट उघडता - बंद करता येते.

शिवाय मागणीनुसार ठरवल्‍याइतकेच पाणी सोडता येत असल्‍याने पाण्‍याच्‍या गैरवापराला आळा बसला आहे. तसेच कालव्‍याच्‍या शेवटच्‍या टोकापर्यंत (टेल एंड) पाणी पोचत आहे. परिणामी पाणी मिळत नसल्‍याची शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर झाल्या आहे. त्‍याचबरोबर पाण्‍यासाठी कालवा फोडाफोडीतून होणारे तंटेही थांबले आहेत. मात्र, पुढारलेल्‍या महाराष्‍ट्रात यावर अद्याप केवळ विचारविनिमयच सुरू आहे. दरम्यान, या राज्यात असा पॅटर्न राबविण्याची गरज आहे.

गेल्‍या काही वर्षांत भीमा, कृष्‍णा नदीवरील बंधारे, तलाव भरण्‍याच्‍या योजना यामुळे कर्नाटकातील सीमाभागातील कृषी सिंचनाच्‍या क्षेत्रात वाढ झाली आहे. आता सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांद्वारे कालव्‍यावर लक्ष ठेवता येणाऱ्या आणि रिमोटद्वारे नियंत्रित करता येणाऱ्या स्‍काडा प्राणलीद्वारे पाणी वाटपात शिस्‍त आणली आहे.

आधी कर्मचाऱ्यांद्वारे कालव्‍याचे गेट उघडणे - बंद करणे, पाण्‍याच्‍या प्रवाहावर लक्ष ठेवणे, कालव्‍याची निगराणी करणे ही कामे करावी लागायची. मात्र, आता थेट नियंत्रण कक्षातूनच ही कामे केली जात आहेत. यादगिरी जिल्ह्यातील नारायणपूर (जि. यादगिरी) धरणाच्‍या डाव्‍या कालव्‍यावर ही यंत्रणा उभारण्‍यात आली आहे. २०१४ मध्‍ये पथदर्शी प्रकल्‍प म्‍हणून हुणसगी शाखा कालव्‍यावर ३६५ रिमोट नियंत्रित गेट बसविले.

तो यशस्‍वी झाल्‍यानंतर दुसऱ्या टप्‍प्‍यात यादगिरी, कलबुर्गी, विजयपूर या जिल्ह्यातील कालव्‍यांवर ४ हजार २०३ स्‍काडा ॲटोमॅटिक सिस्‍टीम आधारित गेट बसविले आहेत. तर ४५ क्रॉस रेग्‍युलेटर गेट बसविले आहेत. यासाठी नारायणपूर, भीमरायनगुडी येथे नियंत्रण कक्ष स्‍थापन केले आहेत. या कालव्‍यांतर्गत एकूण २० हजार हेक्‍टर लाभक्षेत्र आहे.

कालव्‍याला पाणी सोडल्‍यानंतर शेवटच्‍या टोकापर्यंत पाणी पोचले नाही. कर्मचारी शेतकऱ्यांच्याबाबतीत भेदभाव करतात, अशा सोलापूरसह राज्‍यातील लाभधारक शेतककऱ्यांच्या कायम तक्रारी असतात. पाणी मिळविण्‍यासाठी शेतकरी कालवा फोडतात. त्‍यांना पाणी मिळवून देण्‍यासाठी राजकीय नेते, कार्यकर्त्‍यांनीही कालवे फोडल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत.

त्‍यामुळे पोलिसांत गुन्‍हेही दाखल झाल्‍या आहेत. मात्र, महाराष्‍ट्रात अद्याप अशी अद्ययावत यंत्रणा अवलंबिली गेली नाही. पाटबंधारे प्रशासन याविषयी अद्याप विचार सुरू असल्‍याचेच सांगत आहे.

कशी चालते यंत्रणा?

कालव्‍यातील पाण्‍याच्‍या प्रवाहाची पातळी कमी - जास्‍त झाल्‍यास नियंत्रण कक्षाला सूचना मिळते. कोठेही कालवा फोडल्‍यास नियंत्रण कक्षातील अलार्म वाजतो. त्‍यानुसार नियंत्रण कक्षातील अधिकारी-कर्मचारी उपाययोजना करतात.

या प्रणालीचा लाभ

कालव्‍याच्‍या शेवटच्‍या टोकापर्यंत पाणी पोचते. त्‍यामुळे कालव्‍यावरील सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ठरवल्‍याइतकेच पाणी सोडता येते. शिवाय बंधारा फुटल्‍यास अथवा फोडल्‍यास तातडीने त्‍या फाटा अथवा उपफाट्यावरील पाण्‍याचा प्रवाह थांबवून तातडीने कालवा दुरुस्‍तीचे काम करता येते. त्‍‍यामुळे पाण्‍याचा अपव्‍यय टळतो. तसेच पाणी मिळविण्‍यासाठी शेतकऱ्यांनी कालवा फोडणे, गेट उघडणे -बंद करणे यातून होणारी भांडणे, हाणामारी, त्‍यातून एकमेकांविरुद्ध पोलिसांत गुन्‍हे दाखल करणे या गोष्‍टी टळतात. कमी मनुष्‍यबळात कालव्‍याद्वारे पाणीवाटपाचे काम होते.

कालव्‍याद्वारे पाणीवाटप कर्मचाऱ्यांद्वारे नियंत्रित केले जायचे. मात्र, रात्री अडचणी यायच्‍या. निश्‍‍चित केलेले पाणी शेतकऱ्यांना देता येत नव्‍हते. पावसाळ्यात कालवा फुटल्‍यास उपाययोजना करण्‍यास विलंब लागायचा. मात्र, आता एकाच ठिकाणाहून पाणीवाटप नियंत्रित करता येते. तसेच कालव्‍याच्‍या शेवटच्‍या टोकापर्यंत पाणी पोचत असल्‍याने सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे.

- मंजुनाथ आर, मुख्‍य अभियंता, कृष्‍णा भाग्‍य जल निगम लिमिटेड, यादगिरी

राज्‍यात कालव्‍याद्वारे पाणी वितरणासाठी स्‍काडा प्रणाली अवलंबिण्‍याविषयी विचार सुरू आहे. त्‍यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, निर्णय झाला नाही.

- हनुमंत धुमाळ, मुख्‍य अभियंता, जलसंपदा, महाराष्‍ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.