संगीत क्षेत्रातील करिअरसाठी सोलापुरातून पुण्यात दाखल झालेल्या केदार कोतकुंडे व विशाल सदाफुले या दोन तरुणांच्या जिद्दीला अखेर यश मिळाले.
दक्षिण सोलापूर : संगीत (Music) क्षेत्रातील करिअरसाठी सोलापुरातून (Solapur) पुण्यात (Pune) दाखल झालेल्या केदार कोतकुंडे (Kedar Kotkunde) व विशाल सदाफुले (Vishal Sadaphule) या दोन तरुणांच्या जिद्दीला अखेर यश मिळाले. केदारने रचलेले व विशालने संगीतबद्ध केलेले 'अधुरी कहाणी' हे गाणे (Song) सोशल मीडियावर (Social Media) झळकले आहे. या गाण्यास काही तासातच 10 हजार जणांनी प्रतिसाद दिला आहे. कोरोना (Covid-19) महामारीमुळे बसलेल्या पीछेहाटीला न जुमानता केदार व विशालने सांगितीक क्षेत्रात मिळवलेले हे यश स्पृहणीय व कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जुळे सोलापूर येथील गणेश बिल्डर्स क्रमांक तीन या वसाहतीत सामान्य कुटुंबातील केदार कोतकुंडे व लष्कर परिसरातील विशाल सदाफुले या दोघांनी बारावीनंतर ऑडिओ इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी पुणे गाठले. अनेक अडथळे पार करत ऑडिओ इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या केदार व विशालने पुणे येथेच करिअरसाठी धडपड सुरू केली. केदार व विशालने कॉलेजमधीलच समाधान वर्तक या मित्रासह बॅंड तयार केला. विविध कार्यक्रमात या त्रिकूट बनलेल्या बॅंडने चांगलाच नावलौकिकही मिळवला.
दरम्यान, कोरोना महामारीचे संकट ओढवले अन् जगच ठप्प झाले. त्याचा परिणाम या तिघांच्या करिअरवरही झाला. काही दिवसांच्या ब्रेकनंतर या तिघांनी पुन्हा काही तरी नवीन करण्याची योजना आखली. त्यातूनच केदारने गिटार वाजवण्याच्या कलेबरोबरच उपजत असलेल्या कवीमनाला उभारी दिली अन् गीतरचना सुरू केली. तर विशाल व समाधान या दोघांनी त्या गाण्याला संगीतबद्ध करण्याचे काम सुरू केले. या तिघांनी पुण्यात सुमारे 450 पेक्षा अधिक कार्यक्रम केले. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत केदार कोतकुंडे याने रचलेल्या 'अधुरी कहाणी' या नवीन गाण्याला शुक्रवारी (ता. 19) 'झी म्यूझिक मराठी'च्या चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याला विशाल सदाफुले आणि समाधान वर्तक यांनी संगीत दिले आहे. गायक ऋषीकेश रानडे यांनी शब्दांना उत्तम न्याय देत गाण्याला चार चांद लावले. गाण्याच्या व्हिडिओची जबाबदारी धीरज आदिक या तरुणाने आपल्या खांद्यावर घेतली आणि 'पी एस प्रोडक्शन'च्या साहाय्याने गाण्याचे शूटिंग पूर्ण झाले. करिश्मा शिंदे आणि अक्षय ढाके यांनी अगदी सहज आणि उत्तम अभिनय केला.
या क्षेत्रात करिअरसाठी धडपडत असताना प्रचंड अडीअडचणी आल्या. अनेकांचे चांगले सहकार्यही मिळाले. आज झी या नामांकित म्युझिक कंपनीने आमचे गाणे प्रदर्शित केले, याचा अतिशय आनंद आहे. रसिकांनी गाणे ऐकून त्यांच्या प्रतिक्रिया द्याव्यात.
- केदार कोतकुंडे, गीतकार
संगीत क्षेत्रात करिअरसाठी चाललेल्या प्रयत्नाला आज पुष्टी मिळाली. यापुढेही आम्ही कायम यामध्ये नवनवीन संगीत रसिकांसमोर देण्याचा प्रयत्न करू. आज प्रसिद्ध झालेल्या गाण्याबाबत रसिकांनी प्रतिक्रिया दिल्यास आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
- विशाल सदाफुले, संगीतकार
बातमीदार : श्याम जोशी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.