मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून मागील दीड वर्षापासून बंद असलेली इंद्रायणी एक्स्प्रेस 1 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
सोलापूर : मध्य रेल्वेच्या (Central Railway) सोलापूर विभागातून मागील दीड वर्षापासून बंद असलेली इंद्रायणी एक्स्प्रेस (Indrayani Express) 1 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूरकरांचा प्रवास सुखकर होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. कोरोनामुळे (Covid-19) मागील दीड वर्षापासून सोलापूर विभागातील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र अनलॉकनंतर केवळ आरक्षित असणाऱ्या गाड्या रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या. (Kolhapur Express including Indrayani will start from Solapur soon-ssd73)
सोलापूर विभागात दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. भाळवणी ते भिगवण या 55 किलोमीटरच्या दुहेरीकणाचे काम हाती घेण्यात आल्याने सोलापूर विभागातून धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस (Hutatma Express) इंजिनिअरिंग ब्लॉक घेतल्याने 31 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे. मात्र भिगवण ते भाळवणी यादरम्यान दुहेरीकरणाचे काम केले जात असल्याने हे काम 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती या वेळी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 1 सप्टेंबरपासून केवळ आरक्षित असणाऱ्या गाड्याच सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आपला प्रवास हा तिकीट आरक्षित करूनच करावा लागणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून इंद्रायणी एक्स्प्रेस, हुतात्मा एक्स्प्रेस, सोलापूर - कोल्हापूर एक्स्प्रेस (Solapur-Kolhapur Express), सोलापूर-मिरज एक्स्प्रेस आदी गाड्या सुरू होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
ठळक बाबी...
इंद्रायणी एक्स्प्रेस 1 सप्टेंबरपासून होणार सुरू
31 ऑगस्टपर्यंत भिगवण ते भाळवणी दरम्यान केले जाणार दुहेरीकरणाचे काम पूर्ण
सोलापूर विभागाकडून गाड्या सुरू करण्याचे नियोजन सुरू
केवळ आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांना करता येणार प्रवास
सोलापूरकरांचा प्रवास होणार जलद
दररोज साधारणपणे तीन तासांचा घेतला जातोय ब्लॉक
"या' एक्स्प्रेस गाड्यांचा असणार समावेश
सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या कोरोनामुळे बंद करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे विभागातील एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, सोलापूर- कोल्हापूर एक्स्प्रेस, सोलापूर- मिरज एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश असणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर यांची प्रवासाची सोय होणार आहे. गाड्या सुरू होणार असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
- संजय पाटील, रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर
सोलापूर विभागात दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. हे काम ऑगस्टअखेर पूर्ण केले जाणार आहे. एक सप्टेंबरपासून विभागात आरक्षित असणाऱ्या गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे.
- शैलेश गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.