मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मा सोलापूरचे लाला वाघमारे

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मा सोलापूरचे लाला वाघमारे
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मा सोलापूरचे लाला वाघमारे
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मा सोलापूरचे लाला वाघमारे Canva
Updated on
Summary

सोलापूर जिल्ह्यातील भोगावती ते सीना नदी दरम्यानची परंडा ते बाळेपर्यंतची 52 गावे 1960 पर्यंत मराठवाड्यात होती.

वडाळा (सोलापूर) : मराठवाडा (Marathwada) म्हटल्यानंतर सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या सीमावर्ती भागाचा संबंध येतोच. कारण, सोलापूर जिल्ह्यातील भोगावती (Bhogavati River) ते सीना नदी (Sina River) दरम्यानची परंडा ते बाळेपर्यंतची 52 गावे 1960 पर्यंत मराठवाड्यात होती. त्यामुळे या परिसरात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या (Marathwada Mukti Sangram) पाऊलखुणा सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आजही पाहावयास मिळतात. यामध्ये तुळजापूर तालुक्‍यातील काटी गावात निजाम राजवटीचे पोलिस आणि लष्करी ठाणे होते. त्यामुळे शेजारच्या गावातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जाचांचा सामना करावा लागायचा.

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मा सोलापूरचे लाला वाघमारे
सोलापूरचा चैतन्य देशात चमकला! लेफ्टनंट पदासाठी एकमेव निवड

1946 ते 1948 या दरम्यान मराठवाड्यात स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले. यामध्ये स्वातंत्र्यवीरांनी सहभाग घ्यायला सुरवात केली. बार्शी तालुक्‍यातील धामणगावची बरीच जमीन ही तुळजापूर तालुक्‍यात असल्याने सारा वसुलीसाठी निजामाच्या लोकांनी तेथे मनमानी सुरू केली. तेव्हा धामणगावचे चंद्रहार देशमुख, दत्तोबा जाधव, सोपान भोसले, बाबूराव कासार, गौस आणि लाला वाघमारे यांनी त्यांना विरोध करण्यात पुढाकार घेतला. यामध्ये न्हावी समाजातील लाला वाघमारे हा पट्टीचा शाहीर होता. कारण, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचाराने तो प्रभावित झालेला होता. तरणाबांड आणि सळसळत्या रक्ताचा लाला वयाच्या 17-18 व्या वर्षात लोकांची दाढी- कटिंग करून उदरनिर्वाह करायचा. याच दरम्यान हा बहाद्दर सायंकाळी आपल्या शाहिरीने लोकांच्या मनात स्वातंत्र्याच्या मशाली पेटवायचा. लाला हा दाढी- कटिंग करत करत रझाकारांच्या गुप्त बातम्या स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत पोचवायचा. याचा सुगावा रझाकारांना लागला. त्यामुळे लाला वाघमारे रझाकारांच्या काळ्या यादीत गेला, तसा लाला भूमिगत झाला. यामुळे रझाकारांनी लालाला पकडण्यासाठी मोठे इनाम जाहीर केले; मात्र स्वातंत्र्यासाठी झपाटलेला लाला रझाकारांच्या पोलिस यंत्रणेला वेळोवेळी गुंगारा देत होता. तरी परंतु आपल्यातील इनामाच्या लालसेपोटी फितुरीने त्यांचा घात केला. संबंधातील जवळच्याच माणसाने त्यांना काटी (ता. तुळजापूर) येथे जेवायला म्हणून नेले. आणि ठरल्याप्रमाणे रझाकारांनी लाला वाघमारेस चोहोबाजूंनी घेरले. हे लक्षात येताच लालाने रझाकारांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी लाला पकडला गेला.

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मा सोलापूरचे लाला वाघमारे
कृषिप्रधान राज्यात जगाचा पोशिंदा शेतकरी घेतोय गळफास!

रझाकारांनी लाला वाघमारेचे अतोनात हाल केले आणि शेवटी काटीच्या शिवारात त्याला अक्षरशः जिवंत गाढले. मराठवाडा स्वतंत्र झाला; परंतु या स्वातंत्र्यसैनिकाची कुणी दखल घेतली नाही. बापाचे छत्र हरवलेल्या लालाने स्वातंत्र्यासाठी स्वतःची आहुती दिल्यानंतरही न्याय मिळाला नाही. त्यानंतर विधवा आई सोनाबाई यांचेही मोठे हाल झाले. तसेच कोवळ्या वयातला आपला भाऊ गेल्याने त्यांचे भाऊ शंकर व रामभाऊ यांनी आईला धीर दिला. ही घटना ऐकल्यानंतर आजही अनेकांच्या अंगावर सरसरून काटे आल्याशिवाय राहात नाही.

स्वातंत्र्यसैनिकांना पुढे सरकारी मानधन सुरू झाले. परंतु, त्याचा लाभ वाघमारे घराण्याला आजवर अजिबात झाला नाही, हे विशेष. 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या काळात धामणगाव येथे लाला मारुती वाघमारे यांचे स्मारक उभा राहिले. हे स्मारक धामणगाव वासीयांसाठी मोठा अभिमान आहे. तरी परंतु, मराठवाड्यासाठी बलिदान देऊन त्याचे स्मारक मराठवाड्याबाहेरच्या सोलापूर जिल्ह्यात उभे आहे. आजही लाला वाघमारे यांच्या भावांची मुले वारसदार धामणगावात आहेत. ते मोठ्या अभिमानाने आपल्या या घराण्याचा वारसा सांगत जगत आहेत. स्वातंत्र्यासाठी जिवंत आहुती द्यावी लागलेल्या लाला वाघमारेंच्या कुटुंबीयांस प्रशासकीय अनास्थेमुळे आजवर कुठलीही मदत मिळाली नाही आणि सन्मानही केला गेला नाही, हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात सोलापूर जिल्ह्यातील 52 गावच्या लोकांनी लढा दिलेला आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरचा दिवस त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा करताना आपला तिरंगा ध्वज फडकावून विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती करावी, जेणेकरून पुढील पिढीत देशप्रेम जागृत होईल.

प्रा. डॉ. सतीश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र इतिहास परिषद

धामणगावच्या सुपुत्राने मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या स्मारकाचे जतन करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

- एस. के. पाटील, सरपंच, धामणगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.