Solapur : महामार्गांचा शेतजमिनींवर घाला ; तीव्र विरोध असूनही भू-संपादनाचा घाट , ११.२५ हजार एकर जमिनी जाणार

महामार्गाला विरोध असतानाही भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जात आहे. यातच गुजरातहून महाराष्ट्रमार्गे तमिळनाडूला नेण्यात येणारा सुरत-चेन्नई आणि सिंदखेडराजा ते शेगाव हा राज्यांतर्गत भक्तिमार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.
Solapur
Solapur sakal
Updated on

सोलापूर / बुलडाणा: पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ

महामार्गाला विरोध असतानाही भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जात आहे. यातच गुजरातहून महाराष्ट्रमार्गे तमिळनाडूला नेण्यात येणारा सुरत-चेन्नई आणि सिंदखेडराजा ते शेगाव हा राज्यांतर्गत भक्तिमार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. या दोन्ही महामार्गांसाठी ११.२५ हजार एकर जमीन ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

गुजरातहून महाराष्ट्रमार्गे तमिळनाडूला नेण्यात येणारा सुरत-चेन्नई आणि सिंदखेडराजा ते शेगाव हा राज्यांतर्गत भक्तिमार्ग नव्याने होतो आहे. हे दोन्हीही महामार्ग प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग आहेत.

वास्तविक, या दोन्ही रस्त्यांना समांतर अन्य पर्यायी रस्ते असतानाही या दोन्ही महामार्गांचा घाट घातला जात आहे. त्यासाठी सुमारे सव्वा अकरा हजार एकर जमिनींचे संपादन होत आहे. परंतु परस्पर सुरू केलेली भूसंपादनाची प्रक्रिया, तुटपुंजा मोबदला, यामुळे शेतकऱ्यांचा त्याला प्रचंड विरोध आहे. तरीही सरकारकडून या जमिनीवर गंडांतर आणण्याचा प्रयत्न सुरूच आहे.

सुरत-चेन्नई हा महामार्ग गुजरातमधील सुरतमधून तमिळनाडूत चेन्नईला जाणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, नगर, बीड, धाराशिव आणि सोलापूरमार्गे कर्नाटकातून पुढे तो तामिळनाडूकडे जाईल. सुमारे १२७१ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल. दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस वे नंतर भारतातील हा दुसरा सर्वात लांब महामार्ग आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०२३ मध्ये या प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली. परंतु महाराष्ट्रासह तेलंगना आणि कर्नाटकात मोबदल्यावरुन भूसंपादनात अडथळे येत आहेत. महाराष्ट्रातही जवळपास भूसंपादनाची प्रक्रिया ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे, पण उर्वरित ठिकाणांवरील प्रक्रिया शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडली आहे. भूसंपादन कायद्यानुसार चार पट मोबदला देण्याऐवजी केवळ दहा टक्के मोबदला देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात असल्याने बाधित शेतकऱ्यांकडून महामार्गाच्या भूसंपादनाला टोकाचा विरोध होत आहे. तसेच मोबदलाही नाकारला जात आहे.

शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून हा मार्ग रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष केली आहे. तसेच विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधीही मांडलेली आहे. आम्ही कायम शेतकऱ्यांसोबत आहेत.

- श्वेता महाले, आमदार, चिखली, जि. बुलडाणा

बाजार मूल्यानुसार बागायतीचा दर एकरी किमान २० ते २२ लाख रुपये आहे, पण आम्हाला प्रतिएकर दोन ते तीन लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. एवढ्या पैशात नवी शेती घेता येत नाही, मग आमचे पुनर्वसन कसे होणार, आम्ही शेती देणार नाही, प्रसंगी आत्मदहन करू.

- बाळासाहेब वाघ, बाधित शेतकरी, रोहकल, ता. परांडा, जि. धाराशिव

भक्तिमार्गासाठी ‘सक्ती’

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगाव हाही नव्याने भक्तिमार्ग म्हणून द्रुतगती मार्ग बांधला जाणार आहे. विशेष म्हणजे नागपूर-मुंबई या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गापासून अवघ्या काही अंतरावरून हा नवा महामार्ग आखण्यात आला आहे. या भक्ती महामार्गासाठी शासकीय स्तरावर टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पुढे नेली जात आहे. दुसरीकडे हा महामार्ग सुपीक शेतजमिनी गिळणार असल्याने शेतकरी प्रचंड विरोध करू लागले आहेत.

बागायतीला साडेतीन, जिरायतीला दोन लाख

सध्याच्या बाजार मूल्यानुसार बागायतीसाठी प्रतिएकरी २० लाख रुपये आणि जिरायतीसाठी १५ लाख रुपयांचा दर गृहित धरुन या रकमेच्या चार पट रक्कम मिळणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात सुरत-चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनात बागायतीसाठी ३ लाख ५० हजार रुपये आणि जिरायत शेतीसाठी २ लाख रुपये असा दर दिला जात आहे. याचा हिशेब करता एकूण रकमेच्या केवळ १० टक्के इतकाच मोबदला शेतकऱ्यांना मिळतो आहे. त्यातही नियमानुसार पुन्हा या दराबाबत शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा नाही.

शेतकऱ्यांच्या मागण्या...

  • शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने भूसंपादन करू नये.

  • भूसंपादन प्रकरणांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापावे.

  • शेतकऱ्यांच्या खटल्यांची जलद सुनावणी आणि निकाल व्हावा.

  • शेतकऱ्यांना मालमत्तेचा अधिकार द्यावा.

  • विकासक आणि भांडवलदारांच्या बाजूने चुकीचा निर्णय घेणाऱ्या भूसंपादन अधिकारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

  • भूसंपादनामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, पुनर्वसन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.