जळकोट : तालुक्यात पेरणीनंतर अतिवृष्टीने व मध्यंतरी पावसाअभावी होरपळून सोयाबीन अत्यल्प प्रमाणात आले आहे. काढणीच्या वेळीही पावसाने पिच्छा केल्याने ते शेतात अडकले असून यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षापासून जळकोट तालुक्यातील खरीप हंगामातील नगदी पैशाचे मुख्य पिक सोयाबीन बनले आहे. २८ हजार हेक्टर्स पेरणीक्षेत्रातील सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचे पिक आहे. हे पिक पावसाला कच्चे आहे. जास्त पाऊस पडला तर या पिकाला सहन होत नाही. एकतर शेंगा गळून पडतात किंवा काड कापून जमा केले तर ढिगातून धूर निघून नुकसान होते.
त्यात पावसाने उघडीप दिली व उन्ह पडले की, उभ्या सोयाबीनच्या शेंगा फुटून रानावर सोयाबीन पसरते, असे दुहेरी नुकसान होते. त्यामुळे योग्यवेळी त्याची काढणी गरजेची आहे. परंतु गेल्या पंधरा वीस दिवसापासून पावसाने पिच्छा केल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. खर्च निघणे कठीण असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली असून रास करुन सोयाबीन वाळवून बाजारात नेले तर विकून दिवाळी साजरी करता येईल. पण पावसाचा अडथळा येत आहे. शुक्रवारीही (ता. २१) पाऊस पडला. काही शेतकऱ्यांनी पावसात काढून मेणकापडाने झाकून ठेवलेले सोयाबीन काडही भिजत आहे.
काढणीचा खर्च तरी निघणार का
सुरवातीला पेरणीनंतर महिनाभर पाऊस लागल्याने, त्यानंतर मध्यंतरी वीस पंचवीस दिवस पाऊस नसल्यामुळे सोयाबीन होरपळले. कसेबसे यातून वाचलेले पीक काढणीच्यावेळी पावसाचा पिच्छा अशा अवस्थेत शेतकरी चिंतेत आहे. कारण काढणीसाठी मजुरांना दिलेले गुत्ते त्याचे पैसे तर वसूल होतील का, अशी शंका काही शेतकऱ्यांना आहे. सोयाबीनच्या पेरणीपासून ते आंतरमशागत, तणनाशके, किटकनाशककांची फवारणी, कापणी, हॉर्वेष्टरद्वारे मळणीतून राशीपर्यंतचा खर्च काढल्यास हाती काही लागत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
अनुदानावर दिवाळीची भिस्त
सतत ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे सोयाबीन राशीला अडथळे येत आहेत. हे पिक अडकल्याने शेतकऱ्यांनाना दिवाळी कशी साजरी करावी, अशी चिंता आहे. राशीसाठी वातावरण साथ देत नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे. आता दिवाळीची भिस्त शासनाकडून मिळणार असलेल्या अतिवृष्टीच्या अनुदानावरच अवलंबून आहे. एका कार्यक्रमात बुधवारी (ता. १९) माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध बँकांना अनुदानाचे धनादेश वितरण झाल्याने ते शेतकऱ्यांना लवकर मिळेल व दिवाळी गोड होईल, अशी आशा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.