‘बार असोसिएशन’साठी वकिलांचाच तंटा! २६ सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेण्याची मागणी
सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनची आगामी निवडणूक २६ सप्टेंबरपूर्वी उरकावी, अन्यथा पुन्हा आवाज उठवावा लागेल, असा इशारा विरोधी गटाचे पॅनेलप्रमुख ॲड. सुरेश गायकवाड यांनी विद्यमान अध्यक्ष ॲड. निलेश ठोकडे यांना दिला आहे. त्यामुळे निवडणुकीचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील वर्षी सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक ऑक्टोबरमध्ये पार पडली होती. २७ ऑक्टोबरला मतदान होऊन नवीन अध्यक्षांची निवड झाली होती. त्यावेळी ॲड. नीलेश ठोकडे यांच्या विधी विकास पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले आणि ॲड. ठोकडे अध्यक्ष झाले. असोसिएशनच्या घटनेनुसार निवडणूक वेळेत व्हावी, अशी अपेक्षा ॲड. गायकवाड यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीत व्यक्त केली. त्यावेळी विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षभर काम करण्याची संधी मिळावी, अशीही मागणी झाली. परंतु, ॲड. सुरेश गायकवाड यांनी सप्टेंबरअखेरीस कोणत्याही परिस्थितीत निवडणूक व्हावी, असा आग्रह धरला. त्यानुसार २५ किंवा २६ सप्टेंबरला निवडणूक होईल, असे नियोजन करण्याचे निश्चित झाले. मात्र, ती तारीख जवळ येत असतानाही निवडणुकीच्या दृष्टीने काहीच हालचाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर ॲड. गायकवाड म्हणाले, विद्यमान पदाधिकाऱ्यांना जूनपर्यंत कालावधी वाढीव मिळावा असे वाटत आहे. त्यांनी दोन-तीन दिवसांत निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू न केल्यास त्यांच्याविरोधात बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, असेही ॲड. गायकवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, दोन-चार दिवसांत वर्गणी संकलित करून निवडणूक सप्टेंबरअखेरीस घेण्याचे नियोजन केले जाईल, असे ॲड. ठोकडे यांनी सांगितले.
ॲड. ठोकडे विरुद्ध ॲड. गायकवाड लढतीची शक्यता
विधी विकास पॅनेलने मागील निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवत बार असोसिएशनची निवडणूक जिंकली. पण, कोरोनामुळे त्यांना अपेक्षित काम करता आलेले नाही. त्यामुळे वकिलांच्या प्रश्नांवर यशस्वी तोडगा निघावा, यासाठी ॲड. नीलेश ठोकडे हे निवडणुकीच्या मैदानात पुन्हा उतरू शकतात. दुसरीकडे, मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ॲड. सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल बार असोसिएशनची निवडणूक लढेल, अशी सद्यःस्थिती आहे.
अध्यक्षांनी सोडविले नाहीत वकिलांचे प्रश्न
विधी विकास पॅनेलचे सोलापूर बार असोसिएशनवर एकहाती सत्ता असतानाही विद्यमान अध्यक्ष ॲड. नीलेश ठोकडे यांना वकिलांचे प्रश्न सोडविता आले नाहीत, असा आरोप ॲड. सुरेश गायकवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. वकिलांच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग नाही, वकिलांसाठी बैठक व्यवस्था नाही, चेंबर कमी आहेत, टपाल कार्यालय त्या ठिकाणी असायला हवे, बॅंकेचे एटीएम नाही, वकिलांची सोसायटी नाही, असे अनेक प्रश्न आहेत. पण, अध्यक्षांना त्याकडे पाहायलासुद्धा वेळ मिळाला नाही, असेही ॲड. गायकवाड यावेळी म्हणाले. पण, आम्ही वर्षभर केलेल्या उपक्रमांची यादीच तयार असल्याचे ॲड. ठोकडे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.