लोकसभा निवडणूकीची तयारी अगदी जोरात सुरु आहे. सगळे पक्ष, त्यांचे जाहीर उमेदवार, संभाव्य उमेदवार आणि इच्छुक उमेदवार सगळेच आपापल्या मतदारसंघाच कामाला लागलेत. हा आता सध्या बदलेल्या राजकीय समीकरणामुळे जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे जो पक्षांसाठी डोकेदुखी ठरलीये आणि विषय जेव्हा लोकसभेचा येतो तेव्हा माढाचं नाव येतचं येत.
लोकसभेला माढ्यातला राजकीय राडा हा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतो. आतासुद्धा माढा हा चर्चेत आलाय तिथल्या उमेदवारीमुळे तिथं भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. पण या उमेवदारीमुळे मोहिते- पाटील मात्र प्रचंड नाराज आहेत आणि त्यांची हीच नाराजी भाजपची डोकेदुखी बनलीये. मोहितेंच्या याच नाराजीमुळे निंबाळकरांचं तिकीट जाणार अशी चर्चा आता रंगलीये. त्यामुळे नेमकं माढ्यात चाललंय काय जाणून सविस्तर.
माढा मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर... माढा हा बारामतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. शरद पवार या मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडणून गेले होते. आजही त्यांचा समर्थक गट या पट्ट्यात आहे. पवारांनंतर विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणी खासदार होते. मोहिते घराणं तिथलं राजकीय प्रस्थ. मोहिते-पाटील हे एक मातब्बर राजकारणी घराणे म्हणून ओळखले जाते. विजयसिंह मोहिते यांच्यानंतर त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते इथे सक्रिय आहेत. जे सध्या भाजपात आहेत.
यंदाच्या लोकसभेला धैर्यशील मोहिते हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. यासाठी मोहितेंनी अनेक महिन्यांपुर्वीच शड्डू ठोकला होता. तशी तयारी सुरु केली होती. पण भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी २०१९ ला राष्ट्रवादीचे संदिप शिंदे यांचा पराभव केला होता. पराभव करत निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरंग लावला होता.
आता माढा लोकसभेचं राजकीय गणित पहायचं झालं तर.. माढ्यात सोलापुर आणि सातारा या दोन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा सामावेश आहे. ज्यात सोलापुरमधील करमाळा , माढा , सांगोला, माळशिरस या चार तर साताऱ्यातील फलटण आणि माण या दोन विधानसभा मतदारसंघांचा सामावेश आहे. यात ६ पैकी ३ ठिकाणी राष्ट्रवादी, २ ठिकाणी भाजप, तर एकाजागी अपक्ष आमदार आहे. म्हणजे एकून पक्षीय ताकद पाहता राष्ट्रवादीच पारडं जड आहे. पण राष्ट्रवादीच्या पक्षफुटीचा फटका यंदा बसू शकतो.
आता याठिकाणी शरद पवारांनी निवडणूक लढवली असा सुर दर निवडणूकीला असतो. पण यंदा अजुनही महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण भाजपने निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं मात्र भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील चांगलेच नाराज आहेत. आणि मोहिते पाटीलच नाहीत तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड चीड दिसून येतो. आणि याचा फटका गिरीश महाजनांना सुद्धा बसला.
मोहिते पाटील यांची नाराजी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन यांना तातडीने अकलूजला पाठविले होतं. सांगितल्याप्रमाणं गिरीश महाजन तिथे पोहोचले पण तिथं मोहितेंचा समर्थक गट पोहोचला होता. महाजनांना अक्षरश: या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जाव लागलं. गिरीश महाजन आणि मोहितेंमध्ये चर्चा सुद्धा झाली पण तोडगा काही निघाला नाही.
या भेटीनंतर महाजनांनी माध्यमांशी बोलतानाही म्हंटलं की, 'माढ्यात विजयदादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही. मी मुंबईला जाऊन फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा करेन. दादांचे पक्षात मोठे वजन आहे.माढ्याची उमेदवारी देण्यापूर्वी चर्चा झाली होती, सर्व्हेही झाले होते. मात्र, एवढा मोठा वाद आणि रोष असेल असे आम्हालाही वाटले नव्हते. मात्र, आज या ठिकाणी आल्यानंतर नाराजीची तीव्रता लक्षात आली. या नाराजीची दखल निश्चितपणे पक्षश्रेष्ठी घेतील, असा विश्वास गिरीश महाजन यांनी बोलून दाखवला.
एवढंच नाही निंबाळकरांच्या उमेदवारीच्या नाराजीवर मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, माजी आमदार नारायण पाटील, जयवंतराव जगताप यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकही झाली.
या बैठकीतल्या चर्चेविषयी जेव्हा विचारलं तेव्हा फक्त स्नेहभोजनासाठी आलो होतो असं म्हणत या नेत्यांनी विषय टाळला खरा पण शेकापचे जयंत पाटील मात्र काहीही स्पष्ट न बोलता खूप काही बोलून गेले.
अकलूजची भूमी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना कलाटणी देणारी आहे. येत्या १० दिवसांत महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण बदललेले दिसेल, असे भाकित शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त करून खळबळ माजवून दिली. आपणाला शरद पवारांनी पाठविले आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी मला कोणीच पाठवले नसले तरी इंडिया आघाडीत शरद पवारांचे शब्द प्रमाण मानतात. त्यामुळे आपण त्यांना सांगून आल्याचेही स्पष्ट केले.
जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार अशीही चर्चा सुरु झाली. कारण भाजपने निंबाळकरांची उमेदवारी जर निश्चीत केलीच तर मोहिते पाटील भाजपच्या विरोधात बंड करत शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वत: गिरीश महाजनांचे माध्यमांशी बोलतानाचे वक्तव्य हे याच राजकीय बंडाकडे इशारा देतंय. असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही.
पण मोहिते पाटलांचा समर्थक गट पाहता महाजन जसे म्हणाले की, मोहिते पाटलांची नाराजी भाजपला परवडणारी नाही, ते खरं होऊ शकतं. कारण या पट्ट्यात शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसला माननारा गट मोठ्या प्रमाणावर आहे. आणि यात भागात 2019 मध्ये माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात धैर्यशील आणि मोहिते पाटील घराण्यांचा मोठा वाटा होता.
त्यामुळे ही लोकसभा असेल काय किंवा आगामी काळातील विधानसभा निवडणूका पाहता मोहितेंना दुर करण्याची एवढी मोठी रिस्क तर भाजप उचलणार नाही. त्यामुळे मोहितेंची नाराजी दुर करण्यासाठी भाजप निंबाळकरांना दिलेली उमेदवारी माघारी घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.