भंडारा, खोबरे व लोकरीची उधळण करत "महालिंगराया बिरोबाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने अभूतपूर्व सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
मंगळवेढा (सोलापूर) : धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया व हुन्नूर बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा उत्साहात रंगला. भंडारा, खोबरे व लोकरीची उधळण करत "महालिंगराया बिरोबाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने अभूतपूर्व सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा पालखी भेट सोहळा झाला नव्हता. कर्नाटकातून आलेल्या भाविकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने नागरिकांवर असलेले निर्बध गत महिन्यात कमी केल्यामुळे जिल्ह्यातील पहिलीच सर्वात मोठी यात्रा भरली. गुरुवारी रात्री मुंडास बांधण्याचा सोहळा पार पडल्यानंतर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास महालिंगराया मंदिरालगतच्या ओढ्यात महालिंगराया -बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालखीचा भेटीचा सोहळा रंगला. महालिंगरायाच्या पालखीस शिरढोणचा बिरोबा- शिलवंती, बिज्जरगीचा बाळाप्पा, जिरअंकलगीचा बिरोबा, सोन्याळचा पांडुरंग- विठ्ठल यांनी भेट दिल्यानंतर महालिंगराया- बिरोबा या गुरू- शिष्याची भेट झाली.
नगारा व ढोल वाजवत प्रत्येक पालखी महालिंगराया पालखीस भेट देत असताना "महालिंगराया बिरोबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आल्याने परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला. या भेटीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व गोवा आदी राज्यांतून सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक खासगी वाहनाने दाखल होऊन याची देही याची डोळा सोहळा अनुभवला. महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्यासह अन्य देवतांच्या भेटीच्या सोहळ्यानंतर मंदिर परिसरात भाकणूक झाली. यंदा पीकपाणी समाधानकारक असून तीन महिन्यांपर्यंत संकटाचे ढग राहतील. पाऊस समाधानकारक राहील अशी भाकणूक झाली. या भाकणुकीकडे भाविकांचे लक्ष लागून राहिलेले असते. सोलापूर व उंब्रजच्या भाकणुकीप्रमाणे येथील भाकणुकीलाही विशेष महत्त्व असते.
या भेटीच्या सोहळ्यास आमदार समाधान अवताडे, डी. व्ही. पी. उद्योग समूहाचे अभिजित पाटील, सभापती प्रेरणा मासाळ, 'दामाजी'चे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, सचिन शिवशरण, डॉ. प्रणिता भालके, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, उद्योजक हनुमंत मासाळ, सुधाकर मासाळ, शिवाजी पटाप, सरपंच मीनाक्षी कुरमुर्ते, शिवानंद कुरमुत्ते, कामानंद हेगडे, शांताप्पा बिराजदार, विठ्ठल सरगर, संतोष चव्हाण यांनी भेट दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी यात्रेदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवला. एसटी महामंडळाच्या संपामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक बंद राहिल्यामुळे एसटीचे नुकसान झाले; मात्र खासगी वाहतूकदारांनी भाविकांची ने- आण करून मोठा व्यवसाय केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.