राज्यात खासगी व सहकारी दूध संस्थांकडून 2 कोटी 10 लाख संकलन होत असून ते 14 कोटी जनतेला आवश्यक असणारे 3.5 दूध येते कुठून?
मंगळवेढा : सध्याचे सरकार हे आपले सरकार असून मतदारसंघातील दूध उत्पादकांच्या प्रश्नावर दुग्धविकास मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून लवकरच तोडगा काढून न्याय मिळवून देऊ, असा विश्वास आमदार समाधान आवताडे (Samadhan Awatade) यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील दूध उत्पादकांच्या (Milk Producer) प्रश्नावर लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, दामाजीचे संचालक अशोक केदार, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, तानाजी काकडे, सुरेश भाकरे, पप्पू काकेकर, अंकुश पडवळे, सुधाकर कवडे, दिगंबर यादव आदींसह तालुक्यातील पशूपालक, दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आवताडे म्हणाले, शेतकरी, डेअरीचालक, संघांनी समन्वयाने काम केले तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. दूध अनुदानासाठी संघांनी केलेला गाफिलपणा शेतकऱ्यांच्या मुळावर आला. साखर कारखानदारीवर साखर आयुक्तांचे निर्बंध असतात, त्याप्रमाणे खासगी संस्थांवरही निर्बंध ठेवण्याची गरज आहे. राज्यात खासगी व सहकारी दूध संस्थांकडून 2 कोटी 10 लाख संकलन होत असून ते 14 कोटी जनतेला आवश्यक असणारे 3.5 दूध येते कुठून?त्यासाठी दुधातील भेसळ रोखण्यासाठी आवाज उठवणार आहे.
येताळा भगत म्हणाले, गायींच्या उत्पादन खर्चापेक्षा मिळणारा दर कमी आहे. आपलं ऐकून घेणारा कोण नसेल तर ओरडायचं कुणासमोर असा प्रश्न समोर आहे. अंकुश पडवळे म्हणाले, खासगी दूध संस्थांचा अंकुश कमी करावा व शासकीय दूध संस्था पुनर्जीवित झाल्या पाहिजे, दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ थांबली पाहिजे, तर जास्तीचा दर मिळू शकेल. दामाजीचे संचालक अशोक केदार म्हणाले, पशुपालकांसाठी असलेली मनरेगातील जनावरांच्या गोठ्याची योजना कागदावर असून अर्ज केलेले शेतकरी अजून वंचित आहेत. ती योजना राबविली तर पशुपालकांना आधार होईल, राजकुमार शहापूरकर यांनी पंढरपुरी म्हैसीचे जतन करण्यासाठी गवळी समाजासाठी लक्ष द्यावे अशी मागणी केली.
विलास डोके म्हणाले, मोठे डेअरी मालक पळवाट काढतात, त्यावर आळा बसवावा. संस्थाप्रमुख व उत्पादकांचे कमिशन निश्चित करावे. बिबिषण लेंडवे यांनी, दुधाचा उत्पादन खर्च 35 रू. असून दुधाचा दर 27 रूपये दिला जात आहे. दुधाचा वाढीच्या वाटेतील गोचिड बाजूला करून दरवाढीसाठी प्रयत्न करावेत. यावेळी बाळासाहेब यादव, देवीदास इंगोले यांनीही मत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.