सोलापूर : कॉंग्रेसमध्ये राहून तुमचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आता आपण शिवसेनेत जाऊ म्हणून नगरसेवक चेतन नरोटे यांनीच सर्वप्रथम सेनाप्रवेशाचा पर्याय काढला. याबाबत त्यांनी वडील विष्णूपंत कोठे व पुतण्या देवेंद्र कोठे यांच्यासमवेत चर्चा केली. त्यानंतर सर्वानुमते शिवसेनेत जाण्याचा निर्णय ठरला. मात्र, आम्ही शिवसेनेत गेल्यानंतर नरोटे हे मात्र, स्वत: कॉंग्रेस नेत्यांजवळ गेले. कॉंग्रेस नेत्यांजवळ जाण्यासाठीच त्यांनी हे कटकारस्थान केल्याचा आरोप शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी "सकाळ'शी बोलताना केला.
मगर यांना वगळून कोंड्याल यांना संधी
विषय समित्यांच्या निवडीत सदस्य निवडताना शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांना संधी देण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली. मात्र, त्यांच्याऐवजी विनायक कोंड्याल यांना संधी देण्यात आली. तत्पूर्वी, स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी शहरप्रमुख प्रताप चव्हाण, महिला आघाडीप्रमुख अस्मिता गायकवाड यांना संधी देण्याची मागणी पक्षातून होत असतानाही कोठे यांनी कंची यांना संधी दिली. त्यामुळे महापालिकेतील कारभाराकडे शिवसेना नेत्यांनी दुर्लक्ष करीत सर्व सूत्रे नाईलाजास्तव कोठे यांच्याकडे सोपविल्याचीही चर्चा आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णूपंत कोठे यांचे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि कोठे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. तत्पूर्वी, चेतन नरोटे यांनी आमदारकीसाठी शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी नरोटे यांनी विष्णूपंत कोठे यांच्यासह पुतण्या देवेंद्र यांच्याशी सातत्याने चर्चा केली. पक्ष बदलाचे निश्चित झाले, त्यानुसार वाट ठरली. परंतु, पक्ष बदलताना नरोटे, मात्र कॉंग्रेसमध्येच राहिले. त्यांना सुशिलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली, असाही आरोप कोठे यांनी केला. भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती, त्यावेळी नरोटे आणि महेश अण्णा यांच्यात चर्चा झाल्याचा मी साक्षीदार असल्याचे देवेंद्र कोठे यांनी स्पष्ट केले. तर कोठे यांना सल्ला देण्याएवढा मी मोठा नसून तात्यांच्या राजकारणातील अनुभववाएवढे माझे वयही नव्हते. दरम्यान, मी महेश कोठे यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये येण्यास सांगितल्यास ते येणार का, असा प्रतिप्रश्न विचारात नरोटे म्हणाले, महेश कोठे हे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठीही त्यांनी माझेच मार्गदर्शन घेतले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "चांगले झाले की माझ्यामुळे आणि वाईट झाले की कॉंग्रेसमुळे' ही भूमिका महेश कोठेंनी सोडावी आणि आघाडीच्या माध्यमातून शहरवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यायला हवे, असे आवाहनही नरोटे यांनी यावेळी केले.
कोठे यांनी केले सोयीचे राजकारण
राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या 51 होती. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका सारिका पिसे यांनी महापौरपदासाठी अर्ज केला. त्यावेळी भाजपकडे 46 नगरसेवकांची ताकद होती. आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा महापौर होत असताना महेश कोठे यांनी पिसे यांना अर्ज माघारी घ्यायला लावला. दुसरीकडे कॉंग्रेसच्या मदतीने तुकाराम मस्के परिवहन समितीचे सभापती झाले. गणेश वानकर यांचा स्थायी समितीच्या सभापतीपदाचा अर्ज कॉंग्रेसच्या मदतीनेच मंजूर झाला. कॉंग्रेसने वेळोवेळी आघाडीचा धर्म पाळल्यानंतरही दुसऱ्यांदा परिवहनचा सभापती निवडताना त्यांनी कॉंग्रेसला न विचारताच शिवसेनेचा उमेदवार दिला. तत्कालीन सभागृह नेते सुरेश पाटील, संजय कोळी यांच्यासोबतही त्यांनी सोयीचे राजकारण केले. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या प्रश्नावरुन सर्व विरोधक एकत्र आल्यानंतर कोठे यांनी महापौरांसोबत अनेक विषयांना मंजुरी दिली, असेही नरोटे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.