अक्कलकोट (सोलापूर) - महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथे आज बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसला. दरम्यान, बंदला पाठींबा दर्शवित आघाडीच्या नेत्यांनी अक्कलकोट बसस्थानकापासून मुख्य मार्गावरून मोर्चा काढला. आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप सिद्धे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय देशमुख, सभापती आनंदराव सोनकांबळे, अशपाक बळोरगी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी काढलेला मोर्चा जसजसे आपल्या दुकानावरून पुढे जात होता. तसतसे अनेक व्यापार्यांनी आपले नंतर दुकान उघडून व्यापार सुरू केला. मोर्चा नंतर दोन तासांनी अपवाद वगळता सर्वच दुकाने उघडली होती. कुणी अर्धे शटर तर कुणी पूर्ण शटर उघडून आपला व्यवहार सुरू केलेला दिसला.
महाविकास आघाडीचे घटक असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांनी मोर्चेचे नियोजन करून व्यापारी महासंघाचा पाठींबा मिळविला होता. दरम्यान, आज सकाळी मोर्चाला सुरुवात होण्यापर्यंत मोठे हॉटेल, मेन रोड व्यापारी आदींनी दुकाने उघडणे टाळली होती तर छोटे हॉटेल, कॅन्टीन आणि जी उघडण्यासाठी पूर्व तयारी अगोदर तयारी करावी लागत नाही. असे सर्व व्यापारी आपली दुकाने उघडून व्यापारास सुरुवात केली. मोर्चा ज्यावेळी निघाला त्यावेळी मात्र सर्वांनी आपले व्यवहार बंद करीत आयोजकांना प्रतिसाद दिला. अक्कलकोट शहरात आठवडा बाजार भरतो अनेक रस्त्यावरील विक्रेते व व्यापारी यांची आठवडा भरात होणारी उलाढाल ती सोमवारी एकाच दिवसात होते. तसेच कोरोनाच्या काळात अनेक दिवस व्यापार ठप्प होते. त्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्याची भरपाई होत नाही, यामुळे सर्वच व्यापारी आपली दुकाने बंद करण्याला नाखूष होती. पण, अक्कलकोट व्यापारी महासंघाने सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. त्याला मोर्चावेळी बंद ठेवत प्रतिसाद दिला. आज सोमवार बाजार असल्याने तिथे भाजीपाला बाजार, किरकोळ विक्रेते, किराणा व्यापारी आदींनी सर्व हळूहळू सुरू केल्याने तिथे बारा नंतर खूप मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. ग्रामीण भागात कुठेही बंदचे परिणाम दिसून आले नाहीत.
प्रतिक्रिया,
प्रसन्न हत्ते, उपाध्यक्ष, व्यापारी महासंघ अक्कलकोट
अक्कलकोटच्या व्यापार्यांची कोरोना काळातील नुकसानीने आर्थिक स्थिती खूप ढासळली आहे. शासनाच्या ताब्यात ज्या काही गोष्टी येतात त्यातून काही तरी मदत व सवलत व्यापारी वर्गास मिळायला हवे, पण दमडीही दिले जात नाही. उठसुठ दुकाने बंद करा असे आवाहन यापुढे कोणतेही शासन आले तरी व्यापाऱ्यांना करू नये व त्यांना वेठीस धरू नये ही कळकळीची विनंती करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.