मानेगाव (सोलापूर) : माढा तालुक्यातील मानेगांव परिसरात गेल्या दोन तीन महिन्यांपासून घरफोड्या, जनावरांच्या चोऱ्या, वाहन चोरीच्या व गुंडगिरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र पोलिस यंत्रणा याबाबतीत गांभीर्य नसून, उलट ग्रामस्थांना घाबरू नका, असा सल्ला देत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
मानेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी मोठा उच्छाद मांडला आहे. गेल्या दोन महिन्यांखाली गावामध्ये नऊ ते दहा घरांमध्ये घरफोड्या झाल्या व काही साहित्य व पैसे चोरीला गेले. यानंतर मानेगाव येथील कबीर कदम यांच्या एक लाख रुपये किमतीच्या दोन म्हशी व एक संकरित गाय चोरीला गेली असून, चोरट्यांनी पूर्ण दावणच रिकामी केली आहे. त्यामुळे कदम यांचा प्रपंच उघड्यावर आला आहे.
तसेच केवड येथील अशोक लटके यांचीही सत्तर ते ऐंशी हजाराची व्यालेली म्हैस चोरीला गेली तर लहान रेडकू पत्र्याच्या शेडमध्ये असल्याने ते वाचले. मानेगाव येथील इलेक्ट्रिक उद्योजक प्रकाश कदम यांच्या घरासमोरून सुमारे एक लाख रुपये किमतीची तांब्याची तार चोरट्यांनी पळवली आहे तर मानेगाव येथील माणिक बेडगे यांची सत्तर हजार रुपये किमतीची दुचाकी गाडी गेट उघडून चोरट्यांनी पळवली आहे.
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दोन मोठ्या दुकानांतून सीसीटीव्ही कॅमेरे यासह जबरी चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता पोलिस यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वीही मानेगाव आठवडे बाजारातून मोबाईल मोठ्या प्रमाणात चोरीला गेले आहेत. त्यामुळे मानेगाव पोलिस चौकी असून अडचण नसून खोळंबा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सर्व प्रकरणांचा तपास लागत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मानेगाव परिसरात जनावरे चोरीला जाण्याच्या घटनांनी असल्या कडाक्याच्या थंडीतही शेतकरी जनावरांजवळ झोपणेच पसंत करीत आहेत, तर काही शेतकऱ्यांनी चक्क जनावरे घरीच बांधण्यास सुरवात केली आहे.
माझी सर्वच जनावरे चोरीला गेली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पोलिस यंत्रणा फक्त नादी लावण्याचे काम करत आहे. तपास होणे गरजेचे आहे.
- कबीर कदम,
शेतकरी, मानेगाव
मानेगाव येथे झालेल्या चोऱ्यांचा तपास योग्य दिशेने चालू आहे. मानेगाव येथे मुख्य चौकात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न चालू आहे. लोकांनी घाबरू नये.
- अमूल कादबाने,
पोलिस निरीक्षक, माढा पोलिस ठाणे
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.