मंगळवेढा : शहरातून भरधाव वेगात जाणारी अवजड वाहतूक बंद करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने बसविण्यात आलेल्या गतिरोधकाच्या निकृष्ट कामाचा नागरिकांनीच पंचनामा केला. यासंदर्भात चोखामेळा व सप्तशृंगी नगरमधील नागरिकांनी नगरपालिकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
बाह्यवळण रस्ता होऊनही अनेक अवजड वाहने भरधाव वेगाने शहरातून जातात. यामुळे आतापर्यंत अनेकांचा अपघातात बळी गेला आहे. मंगळवेढा-पंढरपूर रोडवर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने या मार्गावर गतिरोधक व अवजड वाहतूक शहरातून येऊ नये म्हणून कमान बसविली.
मात्र या कमानीची उंची जास्त झाल्यामुळे अवजड वाहने या कमानी खालून शहरातून बिनधास्त जात असल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत पंढरपूर बायपासपासून ते मरवडे बायपासपर्यंत नगरपालिकेच्या वतीने जे गतिरोधक बसवण्यात आले आहेत, ते गतिरोधक निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यानंतर नागरिकांनी स्वतःहून हाताने काढल्यानंतर हे गतिरोधक निघाले.
यावरून नगरपालिकेचा कारभार हा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नसून ठेकेदारांच्या आर्थिक लाभासाठी असल्याची टीका सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागली. नागरिकांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर दोन दिवसापूर्वी ही अवजड वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला.
मंगळवेढा नगरपालिकेने हे काम निकृष्ट प्रतीचे केले आहे. यात फक्त ठेकेदार जगवण्याचे काम केले. लोकांची सुरक्षितता व सोयीसाठी यामध्ये कोणताही विचार झालेला नाही.
- कृष्णा ओमने, शहराध्यक्ष, मनसे
मांजरासाठी सोडलेल्या दरवाजातून हत्ती जातोय. सरकारी कामाचे उत्तम उदाहरण म्हणजे नगरपालिकेने जड वाहतुकीसाठी उभा केलेले बॅरेगेट. केवळ ठेकेदार जगवण्यासाठी एवढी सगळी उठाठेव शासकीय यंत्रणेने केली आहे. गतिरोधक केलेलेसुद्धा खराब दर्जाचे असून महिन्याच्या आत ते दिसणार सुद्धा नाहीत.
- नागेश डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष, किसान सेल, भाजप
पंढरपूर रोडवर औद्योगीकरण व लोकवस्ती वाढल्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिने नगरपालिकेने उपाययोजना कराव्यात. नसेल तर लगतच्या ग्रामपंचायतीवर जबाबदारी सोपवावी.
- सुहास पवार, माजी उपसरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.