भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार सुरू आहे. त्यामुळे सोलापुरातही या पक्षाचा बोलबाला गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी जोरात सुरू होता.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्या बीआरएस प्रवेशानंतर सोलापुरातील इतर राजकीय पक्षांतील अनेक दिग्गज बीआरएसमध्ये दाखल होतील, असे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, काही दिवस चर्चेत राहिलेल्या या पक्षात येण्यासाठी दिग्गजांनी सहेतुक पाठ फिरवल्याने सध्या तरी बीआरएसची सोलापुरी वाट बिकटच दिसत आहे.
- श्रीनिवास दुध्याल
सोलापूर महापालिका निवडणुकीत बीआरएसचे किमान दहा उमेदवार निवडून येतील, असा विश्वास ज्येष्ठ नेते धर्मण्णा सादूल यांनी व्यक्त केला होता.
तेलंगणात प्रभावी ठरलेले केसीआर यांचा करिष्मा सोलापुरातही चालेल, याचा अंदाज घेऊन सोलापुरातील अनेक राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रमुख बीआरएस प्रवेशासाठी उत्सुक दिसून आले. अनेकजण स्थानिक पातळीवरील बीआरएसच्या सदस्यांना तसे कळवलेही.
मात्र, नावलौकिक मिळवून देईल असा दिग्गज चेहरा पक्षाला अजूनही सापडला नाही. काही दिग्गज नेत्यांनी पक्ष प्रवेशासाठी अटी लादल्या.
एका दिग्गज नेत्याने तर राज्यसभेवर घेतल्यास पक्षात येऊ, अशी अट लादली. तर काहींनी थेट हैदराबाद गाठून केसीआरना भेटण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यातील ठराविक नेत्यांशीच केसीआर यांनी भेटून ‘हितगूज’ साधला. केसीआर यांच्याशी काय चर्चा झाली, इच्छुकांनी काय प्रस्ताव मांडले, याबाबत मात्र केसीआरना भेटी दिलेल्या नेत्यांनी ‘पक्ष प्रवेशाबाबत लवकरच प्रेस घेऊन जाहीर करू’ असे सांगत मधला मार्ग निवडला.
मात्र, नेमकं ‘हितगूज’ काय झालं, ते गुलदस्त्यातच ठेवलं. त्यामुळे बीआरएसच्या सोलापुरातल्या तंबूतील सदस्यही ‘हे काय चाललंय ते आम्हालाही कळेना’चा सूर लावला आहे.
प्रचार अभियानाचं घोडं कुठं अडलं?
‘बीआरएस’कडून राज्यस्तरीय प्रचार अभियानाला १० मेपासून राज्यासह सोलापुरातही सुरवात होणार होती. त्यासाठी ध्वनिफिती व प्रचार साहित्यही सोलापुरात दाखल झाल्याचं कळतं.
तसेच इच्छुक नेत्यांचा पक्षप्रवेशही होणार होता. शहर मध्य, शहर उत्तर व शहर दक्षिण विधानसभा अध्यक्षांचीही नियुक्ती होणार होती.
मात्र, सोलापुरातील बीआरएसचं वातावरण पाहता, प्रचार अभियानाची सुरवात नाही, पक्ष प्रवेश नाही, केसीआर यांचा दौरा नाही अन् कशाचं काहीच नाही.
नेमकं घोडं कुठं अडतंय, याबाबतही पक्षात सध्या सक्रिय सदस्यच अनभिज्ञ दिसून येत आहेत. एकीकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व नांदेडमध्ये बीआरएसची वेगाने वाटचाल सुरू असताना, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात मात्र नुसता सन्नाटाच आहे.
सर्व जात-धर्मसमावेशक ‘बीआरएस’
सुरवातीला केसीआर यांचा बीआरएस म्हणजे ‘तेलुगु समाजाचा पक्ष’ असा समज सर्वांनाच झाला होता. मात्र, केसीआर यांच्या धोरणानुसार हा पक्ष सर्व भाषा, जाती- धर्मसमावेशक असणार आहे.
या पक्षात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांमध्ये तेलुगु भाषिकांव्यतिरिक्त माजी राष्ट्रवादी काँग्रेस व्यसनमुक्ती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव तथा श्री महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष ज्योतिबा गुंड, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष, माजी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव वैभव शेटे, सम्राट मौर्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर, भीम आर्मी सेना, महाराष्ट्रचे संस्थापक महेश डोलारे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष अलीसाब सय्यद, वडार समाज ज्ञाती संस्थेचे प्रदेश सचिव राजू लिंबोळे, पद्मशाली युवा सेनेचे गौतम संगा, व्हिजन इंडिया पार्टीचे संस्थापक विजय चोळ्ळे, व्यंकटेश पोगूल आदींसह २२० जणांची यादी पक्षात प्रवेश करणाऱ्यांची असून, ही यादी केसीआर यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.