सोलापूर : माळशिरसमधून मोहिते-पाटील, फलटणमधून रामराजे नाईक-निंबाळकर आणि सांगोल्यातून माजी आमदार दीपक साळुंखे यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढ्यातून पुन्हा उमेदवारी देण्यास प्रचंड विरोध केला होता.
विरोधाचे आणि दबावाचे राजकारण भाजपने झुगारत राज्यातील पहिल्याच यादीत माढ्यातून पुन्हा खासदार निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी मोदींची गॅरंटी खासदार निंबाळकरांच्या पाठीशी राहिल्याने त्यांचे मुंबई व दिल्ली दरबारातील वजन अधोरेखित झाले आहे.
खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपचे माणचे (जि. सातारा) आमदार जयकुमार गोरे, सांगोल्यातील शिंदे सेनेचे आमदार शहाजी पाटील, करमाळ्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा सुरवातीपासूनच उघड पाठिंबा राहिला होता.
खासदार निंबाळकर यांना २०१९ मध्ये माळशिरस तालुक्यातून भरभरून मते मिळाली होती. आता मोहिते-पाटील गटाचा खासदार निंबाळकर यांना विरोध आहे. मोहिते-पाटलांच्या मतांची भरपाई खासदार निंबाळकर कुठे करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माढा लोकसभेतील सहापैकी सहाही विधानसभा मतदार संघात सध्या महायुतीचेच प्राबल्य आहे. महाविकास आघाडीत माढ्याची जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढते. माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?
याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे. माढ्यात मराठा आणि धनगर समाजाची मते निर्णायक आहेत. महाविकासच्या मतांना महादेव जानकर यांच्या माध्यमातून धनगर मतांची जोड देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहे. माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे महादेव जानकर यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता आहे.
माढ्यात धनगर मतांचा टक्का निर्णायक असल्याने राष्ट्रवादी यावेळेस धनगर उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे नाव सध्या चर्चेत आहे. जानकर यांनी ऐनवेळी माढ्याऐवजी परभणीचा निर्णय घेतल्यास शरद पवारांना सांगोल्यातील अनिकेत देशमुख यांच्या रूपाने सक्षम पर्याय मानला जात आहे.
सांगोल्याचे माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांचे नातू म्हणून डॉ. अनिकेत यांची ओळख आहे. सांगोल्यातील आमदारकीसाठी कै. गणपतराव देशमुख यांचे कोणते नातू मैदानात येणार?, बाबासाहेब की अनिकेत?
हा वादाचा विषय प्रलंबित असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर मेळाव्यात सांगोल्याच्या आमदारकीसाठी बाबासाहेब देशमुख यांची बाजू घेतली आहे. शेकापच्या जयंत पाटील यांनी याच सभेत हातकणंगलेसह माढ्यावर दावा केला आहे. त्यामुळे शेकाप-राष्ट्रवादीची खेळी काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहिते-पाटील यांना २०१९ मध्ये राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी झिडकारले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेल्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या रूपाने त्यांच्यावर भाजपने उमेदवार लादल्याचे दिसले. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोहिते-पाटील समर्थकांनी ‘आपला माणूस, आपला खासदार’ ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेची दखल न घेता उमेदवारीबाबत मोहिते-पाटलांना पुन्हा झिडकारल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.