मोहोळ: गेल्या वर्षभरापासून मोहोळ विधानसभा मतदार संघात खरे राष्ट्रवादीचे कोण? असा सुरु झालेला सघर्षं आता पुन्हा विकोपाला गेला असून, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा धाराशिवचे निरीक्षक रमेश बारसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा कार्याध्यक्षपदी मोहोळ येथील मंगेश प्रकाश पांढरे यांची नियुक्ती केली आहे.
या निवडीचा वाद पुन्हा पेटला असून सदरची नियुक्ती ही पक्ष धोरणाच्या विरोधात असल्याने आपली निवड रद्द करण्यात आली असल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी पांढरे यांना काढले आहे.
दरम्यान या पत्राला उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी आपण सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहात.
राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाहीत. त्यामुळे मी सोलापूर जिल्हा कार्यकारिणीमधील पदाधिकारी नसून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यकारणीमध्ये संघटन सचिव आहे.
त्यामुळे आपण जे पत्र काढले आहे ते वरिष्ठांच्या अधिकाराचा वापर करण्याचा अधिकार आपल्याला नसून, त्याबद्दल आपल्या अधिकाराची माहिती वरिष्ठा कडून घेणे गरजेचे असल्याचे पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिरामकाका साठे यांना काढल्याने मोहोळ तालुक्यातील गेली वर्ष भर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या संघटना बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरा पूर्वी अनगरचा पाटील परिवार भाजप मध्ये जाणार अशा सोशल मीडिया वरून व्हायरल झालेल्या पोस्टवरून गेली वर्षभरामध्ये तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
तर गेल्या काही दिवसांपूर्वी आगरकरांच्या बॅनरवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटोही हटविण्यात आले होते. भरीस भर म्हणून याच काळात भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनगरच्या वाड्याला भेट देत भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते.
मात्र मागील दोन महिन्या पासून पुन्हा या चर्चेला पुर्णविराम मिळाला असला, तरी तालुक्यातील राष्ट्रवादी अंतर्गत अनगर व नरखेड मध्ये सुरू असलेले युद्ध मात्र आजही सुरूच आहे.
दरम्यानच्या काळात रमेश बारसकर यांनी मोहोळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटन सचिव या अधिकाराने अधिकाराचा वापर करून या अगोदर देखील सूरज जाधव यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड केली होती.
त्यावेळी मात्र कोणीही तक्रार केली नव्हती. दरम्यान दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा कार्याध्यक्षपदी पांढरे यांची नियुक्ती केल्याचे पत्र देताच या पदाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी आक्षेप घेतला आहे. तर याच आक्षेपाला रमेश बारसकर यांनी उत्तर दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.