पंढरपूर : माघी यात्रेच्या सोहळ्याकरिता अडीच लाखाहून अधिक भाविकांचे पंढरीत आगमन झाले आहे. मंगळवारी (ता. २०) माघी एकादशी दिवशी चंद्रभागा नदीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखो भाविक चंद्रभागे तीरी जमणार आहेत. मात्र चंद्रभागा नदीत स्नानासाठी पुरेसे पाणी नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारी (ता.१९) श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आठ नंबरच्या पत्रा शेडपर्यंत गेली असून श्रींच्या दर्शनासाठी १६ ते १८ तास लागत आहेत.
माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगण व कर्नाटक राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांच्या गर्दीने ६५ एकर, श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग फुलून गेला आहे. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारीमध्ये चंद्रभागा नदीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे माघी यात्रेला आलेल्या भाविकांना नदीत स्नान करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही.
माघी एकादशीदिवशी चंद्रभागा नदी स्नान हे पवित्र मानले जाते. मात्र नदीपात्रात सध्याच जे पाणी उपलब्ध आहे ते देखील अस्वच्छ आहे. त्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, दशमी दिवशी (ता. १९) गोपाळपूर रस्त्यालगतच्या पत्रा शेडमधील दर्शन रांग आठ नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. पत्रा शेड दर्शन रांगेतील हजारो भाविकांसाठी श्री विठ्ठल मंदिर समितीने अन्नछत्र सुरू केले आहे.
समितीच्या वतीने नवमी दिवशी भाविकांना तांदळाची खिचडी, गोड व तिखट बुंदी, दशमी दिवशी पुरी भाजीचे वाटप करण्यात आले तर एकादशी दिवशी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे. सोमवारी श्री विठ्ठल दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलेले रामचंद्र बाबूराव कदम (रा.जामगे, ता.दापोली, जि. रत्नागिरी) ’सकाळ’शी बोलताना म्हणाले, रविवारी सायंकाळी सात वाजता आठ नंबरच्या पत्रा शेड दर्शन रांगेत होतो; सुमारे सतरा तासांनी दुपारी बारा वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. आम्ही पंचक्रोशीतील शेकडो भाविक दिंडीमधून पंढरपूरला आलो आहोत. मात्र आज श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्याने सगळा शीण निघून गेला.
महिला भाविकांच्या संख्येत घट
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या रास्ता रोको आंदोलनामुळे मराठवाड्यातील काही ठिकाणी एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे एसटी प्रवासामध्ये ५० टक्के सवलत असलेल्या महिला भाविकांच्या संख्येत यंदा घट झाल्याचे जाणवत आहे.
आम्ही दरवर्षी माघी यात्रेसाठी पंढरपूरला येत असतो. दरवर्षी माघी एकादशीला चंद्रभागा नदीत स्नान करतो. मात्र यावर्षी चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गुडघाभर देखील पाणी नाही. त्यामुळे स्नानाची गैरसोय होणार आहे.
- सनगोंडा चन्नप्पा बिराजदार,
भाविक, रा. वज्रवाड, ता. जत, जि. सांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.