सासुरे (सोलापूर) : धामणगावच्या (ता. बार्शी) नरहरी ढेकणे आणि सोजर ढेकणे या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ शेतकरी दाम्पत्याच्या कष्टाला सलाम करीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पन्नास हजारांची आर्थिक मदत केली आहे.
बार्शी - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धामणगावला भेट दिल्यानंतर आर्थिक मदत करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार धाराशिव तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, विभागप्रमुख सौदागर जगताप, बार्शी तालुका शिवसेना प्रमुख प्रवीण काकडे, गणेश पवार, अमोल मुळे यांनी धामणगावातील ढेकणे दाम्पत्याच्या घरी जाऊन ही मदत केली.
पोटाला मूलबाळ नसल्याने स्वतः काम केले तरच चार घास मिळणार हे त्यांना माहीत आहे. म्हणून दुखणंखुपणं सोडून या उतारवयात घाम गाळणं नशिबी आलं. त्यात पाऊस वेळेवर पडला पण पेरलेले सोयाबीन कुठंतरीच उगवले. अशावेळी दुबार पेरणी करण्यासाठी आवश्यक बियाणे आणि ट्रॅक्टरला भाडे परवडणे अशक्य असलेल्या ढेकणे यांनी एकेरी नळ्याच्या सहाय्याने पेरणी केली. वाटीतून बी सोडणारे नरहरी ढेकणे आणि पेरणीचे साधन दोरीने ओढणाऱ्या सोजर ढेकणे हे विदारक चित्र शेतकऱ्यांची अवस्था दर्शविण्यासाठी पुरेसे आहे. पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी आजही अनेकांना संघर्ष करावा लागतो आहे. बारीकसारीक कारणांवरून विवाह मोडलेले आपण नेहमीच पाहतो, पण उन्हाचे चटके आणि समाजाचे लचके सोसत अनेक वेळा उपाशी राहून अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देणाऱ्या जोडप्याचा हा आदर्श वेगळाच!
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.