महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.
मोहोळ (सोलापूर): थकबाकीच्या कारणास्तव मोहोळ तालुक्यातील महावितरणने 250 ट्रान्सफार्मरची वीज कापली असून, अडचणीत आलेला शेतकरी यामुळे अधिकच अडचणीत आला आहे. महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेतकऱ्याकडे शेतीपंपाची थकबाकी आहे. महावितरणाने शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. शासन आदेशानुसार महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता विद्युत कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन वर्षाच्या लॉकडाउन परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल बाजारात विकेना झालय. जो विकतोय तो अगदी कवडीमोल किमतीने. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या गाळप हंगामात कारखान्याकडे गाळपासाठी गेलेल्या उसाचे पैसे अद्याप आले नाहीत. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. मात्र, दुधाला दर तर नाहीत पण पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात कहर म्हणजे किमान दोन ते तीन महिने दुधाच्या पगारी होत नाहीत.
शेतकऱ्याकडे शेती पंपाची लाखोंची बिले थकबाकीत आहेत. थकबाकी भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र चार ते पाच वर्षे महावितरणाने शेतकऱ्यांना बिले मागितली नसल्याने थकबाकीचे आकडे फुगले आहेत. थकबाकी भरण्यासंदर्भात महावितरणाने कसली जरी योजना आणली तरी आज पैसे कुठून भरावयाचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यास समोर आहे. त्यातच तीन, पाच, साडेसात व दहा या अश्वशक्तीच्या मोटारींना वाढीव बिले दिली आहेत, त्यामुळे खरी बिले किती, वाढीव बिले देताना शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची वीजबिले माफ करावीत हा एकच पर्याय आहे.
अल्प कालावधीत येणाऱ्या भाजीपाल्याची लागवड शेतकरी करीत आहेत. त्यामुळे दीड ते दोन महिन्यात हातात पैसे येतात व देणे-घेणे करणे सोपे जाते. दोडका, कारली, भेंडी, गवार, टोमॅटो या पिकासह झेंडू व शेवंती या फुलांची ही मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र, त्यांना बाजारात मिळणारा दर हा कवडीमोल असल्याने महावितरणाचे पैसे भरावे कशाने याची विवंचना शेतकऱ्यात आहे.
शेतीमालाचे दर
- ढोबळी मिरची : 30 रुपये (दहा किलो)
- टोमॅटो : 50 रुपये (दहा किलो)
- भेंडी : 80 रुपये (दहा किलो)
- दोडका : 30 ते 35 रुपये (दहा किलो)
- शेवंती : 300 रुपये (दहा किलो)
- झेंडू : अडीचशे ते तीनशे रुपये (दहा किलो)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.