Breaking! आयुक्तांनी महापालिकेतील "या' 24 अधिकारी अन्‌ कर्मचाऱ्यांची रोखली वेतनवाढ 

SMC
SMC
Updated on

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्याच्या हेतूने महापालिका आयुक्‍तांनी प्रत्येक कर्मचाऱ्यावर स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविली आहे. तरीही आदेशाचे उल्लंघन करीत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 24 जणांवर महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी कारवाई केली आहे. त्यातील दोन वैद्यकीय अधिकारी, सहायक अभियंता, लिपिक, आवेक्षक असे प्रत्येकी एक आणि सहा भूमापकांची वेतनवाढ रोखली आहे. तर मानधनावरील दोन आवेक्षकांना घरचा रस्ता दाखविला आहे. 

महापालिकेचे तत्कालीन आयुक्‍त दीपक तावरे यांची शासनाने उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी पी. शिवशंकर यांची नियुक्‍ती करण्यात आली. त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये स्वयंशिस्त लागावी, महापालिकेची स्थिती सर्वांगीण सुधारावी, शहरातील कोरोना हद्दपार व्हावा, या हेतूने कारवाईचा बडगा उगारला. पदोन्नतीने लिपिक झालेल्यांची संगणक व टायपिंग परीक्षा घेण्यापासून ते अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी रोखण्यापर्यंत त्यांनी धडक कारवाई केली. त्यांच्या प्रयत्नातून शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून, राज्याच्या पटलावरून मृत्युदरात सोलापूर शहर अव्वल असल्याचा ठपका पुसण्यात ते यशस्वी ठरले. दरम्यान, कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना त्यांनी थेट घरचा रस्ता दाखविण्याचा इशारा देत, वेतनवाढ थांबविण्याचे आदेशही काढले आहेत. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने आता कर्मचारीही अचूकपणे काम करू लागल्याचे चित्र आहे. 

आयुक्‍तांनी "या' कर्मचाऱ्यांवर केली कारवाई 
पंकज उपाध्ये, प्रशांत गुंड, राजकुमार मेश्राम, विष्णू कांबळे, अनिकेत कांबळे, सलमान मनियार, नीलेश कंदलगावकर, राहुल कांबळे, आनंद जोशी, अशोक डाके (आवेक्षक), अरुण खेंदाड, म. सलीम कोरबू, विनायक चिंचुरे, योगीराज याटकर, सलीम वळसंगकर (भूमापक), अर्जुन कदम, रफिक शेख, चंद्रकांत श्रीमंगले, सुलभा भोसले (लिपिक), खलिक मुल्ला, चॉंदसो बागवान (व.मु.ले.), के. जी. सातपुते (सहाय्यक अभियंता) आणि डॉ. समशादबेगम साचे, डॉ. जयंती आडके यांचा कारवाई केलेल्यांमध्ये समावेश आहे. 

कारवाईचे "असे' आहे स्वरूप 
मानधनावरील दोन आवेक्षकांपैकी एक परस्परच गैरहजर राहिला, तर दुसऱ्याने आजारी असल्याचा बनाव केल्याने त्यांना आयुक्‍तांनी घरी बसविले. तर कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगच्या कामात हलगर्जीपणा केल्याने सहा आवेक्षकांना एकूण मानधनाच्या दहा टक्‍के दंड ठोठावला आणि एका कायमस्वरूपी आवेक्षकाची एक वेतनवाढ रोखली. टाईम स्टॅम्प कॅमेऱ्याद्वारे फोटो व हजर-गैरहजर सेवकांची माहिती वेळेत न दिल्याने पाच लिपिकांना वेतनवाढ रोखण्याची समज दिली. एका लिपिकाची एक वेतनवाढ रोखली. सहा भूमापकांनी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगच्या कामात हयगय केल्याने त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली. तर प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्‍त आले, त्या वेळी गैरहजर राहिलेल्या एका सहाय्यक अभियंत्याच्या दोन वेतनवाढी रोखण्याचे आयुक्‍तांनी आदेश दिले. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोठा हलगर्जीपणा 
शहरातील नागरी आरोग्य केंद्रांची जबाबदारी असतानाही एक महिला वैद्यकीय अधिकारी विनापरवानाच कामावर गैरहजर राहिल्या. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्यांच्या दोन वेतनवाढी रोखण्याचा निर्णय घेतला. दुसरी गंभीर बाब म्हणजे, दुसऱ्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे आयुक्‍तांनी शहरातील विविध हॉस्पिटलचे रिपोर्ट नियमित कंट्रोल रूमला कळवावेत, असे निर्देश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने ते रिपोर्ट स्वत:कडेच ठेवत कंट्रोल रूमला वेळेत दिलेच नाहीत. त्यामुळे आयुक्‍तांनी त्यांच्याही दोन वेतनवाढी रोखत त्यांना समज दिली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.