निर्धार मेळाव्याप्रसंगी पहिल्या रांगेतील कोपऱ्यात बसलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी एका माजी आमदारांना बसायला खुर्ची नसल्याने स्वत:ची खुर्ची दिली. पण, काहीवेळ होऊनही आपल्याला बसायला कोणी खुर्ची आणत नसल्याची खंत मनात ठेवून धवलसिंह कार्यक्रम सोडून निघून गेल्याचे पाहायला मिळाले.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी काँग्रेसकडून नियोजन केले जात आहे. वरिष्ठ नेते राज्यभर दौरे करीत आहेत. पण, काँग्रेसमधील गटबाजी काही संपायला तयार नाही, याचे दर्शन रविवारी (ता. २१) हुतात्मा स्मृती मंदिरातील निर्धार मेळाव्यात पाहायला मिळाले.
प्रमुख पाहुणे म्हणजेच मंत्री, आमदारांच्या रांगेत प्रोटोकॉलनुसार जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला बसायला एका कोपऱ्यात खुर्ची मिळाली. पण, आमदार प्रणिती शिंदे व्यासपीठावर आल्यानंतर समोरील रांगेत खुर्च्या कमी पडल्या आणि माजी आमदाराला खुर्चीवरून उठाव लागले. पक्षासाठी त्यांचा त्याग, कार्य मोठे असल्याचा रिस्पेक्ट ठेवून धवलसिंहांनी त्यांना स्वत:ची खुर्ची दिली. त्यावेळी धवलसिंहांना दुसरी खुर्ची देणे अपेक्षित होते.
मात्र, थोडावेळ होऊनही तसे काहीच झाले नाही. त्यामुळे उभारलेल्या धवलसिंहांनी कार्यक्रमातून बाहेर जाणेच पसंत केले. बाळासाहेब शेळके यांनी त्यांना हटकले, पण काहीतरी सांगून ते निघून गेल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, निर्धार त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धवलसिंहांचे नाव घेतले, पण ते व्यासपीठावरच नव्हते. त्यावेळी व्यासपीठावरील काहींनी बाहेर गेले असून येतील, असा इशारा करून वेळ मारून नेली. काँग्रेस कार्यकर्ते सातलिंग शटगार यांच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडल्याची चर्चा होती.
...तेथे पण असेच झाले
सकाळी साडेअकरा वाजता होणारा निर्धार मेळावा दुपारी दोन वाजता सुरु झाला. माध्यम प्रतिनिधींसह कार्यकर्ते उपाशीपोटी तसेच हुतात्मा स्मृती मंदिरात बसून होते. तत्पूर्वी, अशोक चौक परिसरातील एमपीएससी, युपीएससी अभ्यासिका केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यानंतर काँग्रेस नेत्यांनी तेथील उपस्थितांना संबोधित केले.
पण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाषणाला उठले. पण तेथील कार्यक्रम संपल्याचे समजून व्यासपीठावरील बरेच जण स्टेजच्या खाली आले. पुन्हा नाना पटोलेंचे भाषण होईपर्यंत त्यांना व्यासपीठावर जाऊन बसावे लागले.
व्यासपीठावर नेमकं घडलं काय?
शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये शहराध्यक्ष चेतन नरोटेंची खुर्ची पहिल्या रांगेत होती. तर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हे पहिल्याच रांगेत, पण सर्वात शेवटी बसले होते. मात्र, आमदार प्रणिती शिंदे स्टेजवर आल्यानंतर समोरील रांगेत खुर्च्या कमी पडल्या आणि माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांना उभारावे लागले. त्यावेळी धवलसिहांनी त्यांची खुर्ची त्यांना दिली.
पण, त्याबदल्यात धवलसिंहांना काहीवेळ खुर्ची मिळालीच नाही. त्यामुळे कार्यक्रमाला सुरवात होत असतानाच धवलसिंह अचानक हुतात्मा सभागृहाबाहेर आले आणि तेथे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्याशी बोलून ते तसेच निघून गेल्याचे पाहायला मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.