सोलापूर - भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक कारागिरांचा समावेश होतो. या पारंपारिक कारागीरांना "विश्वकर्मा" म्हणून संबोधले जाते. जिल्ह्यातील 18 पारंपारिक व्यवसायातील लाभार्थ्यांची नोंदणी करून त्या लाभार्थ्यांची सरपंचामार्फत पडताळणी केली जाईल. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देऊन 'प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने'ची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला आहे.
त्यासंदर्भात गुरुवारी बैठक झाली. यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी धुरंदर बनसोडे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, 'कौशल्य विकास'चे सहाय्यक आयुक्त हनुमंतराव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सक्त सूचना...
- या योजनेसाठी पात्र पारंपारिक व्यवसायातील सर्व लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय व सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत.
- या योजनेच्या प्रचार व प्रसार करून पारंपारिक व्यवसायातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
प्रारंभी 'या' 18 उद्योगांचा योजनेत समावेश
सुतार, बोट बनविणारा, चिलखत बनविणारा, लोहार, हातोडा आणि हत्यारे- औजारे साहित्यांचा संच बनविणारा, कुलुपे बनविणारा, शिल्पकार (मूर्तिकार, दगड कोरणारा), सोनार, कुंभार, चांभार, गवंडीकाम, टोपली-चटई- झाडू बनविणारा, बाहुली आणि खेळणी बनविणारा, न्हावी, माळा बनविणारा, धोबी, शिंपी, मासे पकडण्याचे जाळे बनविणारा आदी.
योजनेसाठी पात्रता...
1) स्वंयरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि योजनेतील 18 व्यवसायांपैकी कुटुंब आधारित पारंपारिक कारागीर नोंदणीसाठी पात्र असेल.
2) लाभ प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यालाच मिळेल. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अविवाहित मुले होय.
3) लाभार्थीचे वय नोंदणीच्या तारखेला 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
4) जर एखाद्याला योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याला त्याच व्यवसायात काम करावे लागेल, ज्यामध्ये त्याने नोंदणीवेळी व्यवसाय करण्याची माहिती दिली होती.
5) मागील 5 वर्षांत स्वंयरोजगार तथा व्यवसाय विकासासाठी इतर योजनांतर्गत कर्ज घेतलेले नसावे. (उदा. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे PMEGP/CMEGP आणि PM SVANIDHI तथापि MUDRA)
6) PM SVANIDHI चे लाभार्थी ज्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे, ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पात्र असतील.
7) सरकारी सेवेत कार्यरत असलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेअंतर्गत पात्र असणार नाहीत.
पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे....
1) यशस्वी नोंदणी आणि पडताळणीनंतर लाभार्थीला पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल.
2) कौशल्य पडताळणीनंतर पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व 15 दिवसीय प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
3) प्रशिक्षण कालावधीत दररोज प्रत्येक प्रशिक्षणार्थीना नमस्कार 500 रुपये विद्यावेतन मिळणार आहे.
4) त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूलकिट (व्यवसाय साहित्य) खरेदीसाठी 15000 रुपयांचे ई-व्हावचर दिले जाईल.
5) मुलभूत कौशल्य प्रशिक्षणानंतर लाभार्थी योजनेच्या लाभासाठी पात्र होईल. पहिल्या टप्यात 5 टक्के व्याजासह 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह एक लाखापर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळेल.
6) दुसऱ्या टप्यात प्रगत कौशल्य प्रशिक्षण घेतले आहे. डिजिटल व्यवहार स्विकारलेले आहेत. त्यांना 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह २ लाखापर्यंत तारणमुक्त कर्ज मिळेल.
7) डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन, लाभार्थींना जास्तीत-जास्त 100 व्यवहारांसाठी मासिक प्रति व्यवहार एक रुपया प्रोत्साहनपर मिळेल.
8) मार्केटिंग सहाय्य : प्रचार- प्रसिध्दी, गुणवत्ता प्रमाणीकरण, बँन्डींग व प्रदर्शने, यासाठी त्यांना वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळेल.
नाव नोंदणी कशी आणि कोठे करायची...
1) सामान्य सेवा केंद्राकडे (कॉमन सव्हिस सेंटर) "पंतप्रधान विश्वकर्मा पोर्टल"वर ऑनलाईन अर्जाद्वारे नावनोंदणी करावी. ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचांना भेटून नावनोंदणी करावी. तसेच शहरी भागासाठी नगरपरिषद कार्यालयामार्फत कॉमन सर्विस सेंटरमधून नावनोंदणी करावी. या योजनेअंतर्गत नावनोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
2) लाभार्थीच्या तपशिलांची तपासणी ग्रामपंचायत प्रमुख तथा शहरी स्थानिक संस्थेचे कार्यकारी प्रमुख यांच्याव्दारे केली जाईल.
3) त्यानंतर जिल्हा अंमलबजावणी समिती तपासणी करेल आणि लाभार्थींच्या नावाची शिफारस होईल.
4) त्यानंतर स्क्रीनिंग समिती ही जिल्हा समितीने शिफारस केलेल्या लाभार्थीच्या प्रस्तावांचे पुनरावलोकन आणि मूल्यांकन करण्यात येवून लाभार्थीची अंतिमत: निवड करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.