सोलापूर, ता. २९ : सोलापूर जिल्ह्याशी निगडित असलेल्या सोलापूर, माढा व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
या पराभवाची चर्चा संपण्यापूर्वीच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या सोलापूर बाजार समिती व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. सोलापूरसाठी ५ हजार ४७० तर बार्शीसाठी ५ हजार ४६१ मतदार असण्याची शक्यता आहे.
या दोन्ही बाजार समित्यांवर पूर्वीपासूनच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. बाजार समित्यांसाठी आता व पूर्वी सोसायटी, ग्रामपंचायत मतदारसंघातून मतदान होत असल्याने या बाजार समित्या कधीच भाजपच्या ताब्यात गेल्या नाहीत.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समितीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर २०१८ मध्ये या बाजार समित्यांवर सत्ताबदल झाला. बार्शीची कृषी उत्पन्न बाजार समिती माजीमंत्री दिलीप सोपल यांच्याकडून भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या हातात गेली.
सोलापूर बाजार समितीसाठी तत्कालीन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख विरुद्ध तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली. विजयकुमार देशमुख यांचे पॅनेल सर्वपक्षीय असल्याने त्यांचा एकहाती विजय झाला.
सुरवातीचे काही महिने वगळता, सोलापूर बाजार समितीचे सभापतिपद आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे राहिले आहे. सोलापूर बाजार समितीवरील आमदार देशमुख यांची पकड पाहता, सत्ताधारी संचालकांमध्ये धुसफूस सुरू झाली. परंतु आमदार देशमुखांनी संचालकांना सर्वार्थाने आपलेसे केल्याने बाजार समितीवर आमदार देशमुख हेच निर्णायक राहिले आहेत.
बाजार समितीची आता निवडणूक झाल्यास सोलापूरसाठी आमदार विजयकुमार देशमुख तर बार्शीसाठी आमदार राजेंद्र राऊत यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी बाजार समित्यांची निवडणूक झाल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचला आहे. त्यातच आता बाजार समितीची निवडणूक ग्रामपंचायत व सोसायटी मतदारसंघातून होणार आहे. खचलेला आत्मविश्वास व निवडणुकीची जुनी पद्धत यामुळे निवडणूक झाल्यास भाजपला विधानसभेपूर्वी बाजार समिती निवडणुकीच्या कठीण परीक्षेचा पेपर द्यावा लागणार आहे.
सोलापूरचे अंदाजे मतदार
१. वि.का. सेवा संस्था मतदारसंघ
सोलापूर शहर १९३
दक्षिण सोलापूर १०३९
उत्तर सोलापूर ६६३
एकूण १८९५
दक्षिण सोलापूर ८४४
उत्तर सोलापूर ३७०
एकूण १२१४
३. व्यापारी मतदार संघ १२७६
४. हमाल तोलार मतदार संघ १०८५
एकूण एकंदर ५४७०
बार्शीचे अंदाजे मतदार
१. वि.का. सेवा सह. संस्था मतदार संघ १६६१
२. ग्रामपंचायत सदस्य मतदार संघ १०५६
३. व्यापारी मतदार संघ १७२३
४. हमाल तोलार मतदार संघ १०२१
एकूण एकंदर ५४६१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.