सोलापूर : गणरायाच्या आगमनानंतर आता शनिवारी (ता. ३) गौरीचे आगमन होणार आहे. गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी उत्सवाची लगबग सुरू आहे. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. गेली दोन वर्षे उत्सवावर कोरोनाचे सावट होते, यंदा मोठ्या थाटात घरोघरी गौरीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. खरेदीसाठी बाजारपेठा बहरल्या असून, ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
गणेशोत्सवात माहेरवाशिणी-सारखे गौरीचे स्वागत केले जाते. तिला नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. गणपती बाप्पा आगमनाच्या तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन केले जाते. विविध सामाजातील विविध प्रथा- परंपरेप्रमाणे गौरीपूजनाची प्रथा आहे. आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवतात. तर, पूजनाला वेगवेगळ्या पद्धतीच्या खाद्यपदार्थांचा थाट असतो. फळे, करंज्या, लाडू, पुऱ्या, सांजोऱ्या, बर्फी आदी पदार्थ नैवेद्यामध्ये असतात. दुपारी पुरणपोळी, खीर, पुरी, घावन, घाटल्या, आंबिल यांसह सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा असते. यासाठी पालेभाज्यांची खरेदी, आरासात मांडण्यासाठी खाद्यपदार्थ, सजावटीचे साहित्य यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत एकच झुंबड उडाली आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली केवळ धार्मिक परपंरेनुसार साध्याच पद्धतीने गौरीचे स्वागत झाले होते. यंदा कोरोनाचे निर्बंध उठल्याने मधला मारुती, टिळक चौक, अशोक चौक, विजयपूर रोड आदी ठिकाणच्या बाजारपेठांत विविध साहित्यांचे मोठ्या प्रमाणात स्टॉल थाटण्यात आले आहेत.
फुलांचे दर स्थिर, पुष्पहार वधारले
गौरी-गणपती उत्सवात हार,दांडा,गजरे आदींना मोठी मागणी असते.सध्या जिल्ह्यातून मार्केट यार्डात पापरी, खंडाळी, मोहोळ, पंढरपूर आदी ठिकाणाहून प्रतिदिन साधारण पाच टन फुलांची आवक होत आहे. मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे फूल शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेवंती ६० ते १२० रुपये, गुलाब १०० ते २००, काकडा २०० ते ३००, काश्मिरी गुलाब १०० ते १५०, झेंडू १० ते ३०, निशिगंध १०० ते १५० रुपये प्रतिकिलो असे फुलांचे दर आहेत. परंतु लक्ष्मीसाठी खरेदी होणारे हार व दांड्याचे दर मात्र प्रतिजोडी ५०० ते १००० रुपयांपर्यंत आहेत.
लक्ष्मीचे प्रतीक : सूप, दुरडी, झाडू.
घरात जातं, उखळ, सूप, दुरडी, झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. गौरीच्या सणानिमित्त या वस्तूंची खरेदी केली जाते. त्या निमित्ताने बाजारपेठेत ठिकठिकाणी सूप, दुरडी, झाडू खरेदी-विक्री करणाऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
फळांचे वाढले भाव
गौरीच्याआरासासमोर पाच प्रकारची फळे ठेवण्यात येतात.तर आरास आणखीन आकर्षक करण्यासाठी या ऋतूमध्ये येणारी विविध प्रकारची फळेदेखील ठेवली जातात.यात प्रामुख्याने सफरचंद,केळी,पेरू,डाळिंब, मोसंबी या पाच फळांची खरेदी होते.परंतु उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळांचे भाव दहा टक्क्यांनी वधारले आहेत.
दिवसभरात कधीही करा गौरी आवाहन
गौरी आवाहन हे अनुराधा नक्षत्रावर करण्यात येते. शनिवारी (ता. ३) अनुराधा नक्षत्र कायम असल्याने दिवसभरात कधीही गौरी आवाहन करता येणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.