आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लस टोचून न घेणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुणांची संख्या लक्षणीय आहे.
सोलापूर : जिल्ह्यातील 18 वर्षांवरील जवळपास 35 लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid-19 Vaccine) टोचणे अपेक्षित आहे. परंतु, साडेबारा लाखांहून अधिक व्यक्तींनी एकही डोस घेतला नसून त्यात तब्बल 11 लाख 60 हजार (18 ते 45 वयोगट) तरुणांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लस टोचून न घेणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुणांची संख्या लक्षणीय आहे.
पोलिओ लसीकरणावेळी 'दो बूँद जिंदगी के' असा प्रचार करण्यात आला. अनेकांनी लस टोचून घेतली आणि लोकांना त्याची सवय लागली. परंतु, कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण सुरू झाल्यापासून नागरिकांमधील लसीबद्दलचे गैरसमज अजूनपर्यंत दूर करण्यात प्रशासनाला यश मिळालेले नाही. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्यानंतर कोरोना गेला, असा समज तरुणांमध्ये आहे. आम्ही नियमित व्यायाम करतो, अंडी- मटन खातो, मद्यपान करतो आम्हाला काय होणार नाही, असाही काहींनी समज करून घेतला आहे. लस घेतल्यानंतर दुसराच काहीतरी आजार व्हायचा, असाही गैरसमज दिसून येतो. गावोगावी लसीकरणाचे कॅम्प आयोजित करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याची स्थिती आहे. आता महाविद्यालय स्तरावर लसीकरण राबविले जात असून त्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांसह त्यांच्या पालकांनाही लस टोचण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तरीही, त्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाही. तरुणांचे विशेषत: कॉलेजच्या व कामाच्या निमित्ताने वारंवार घराबाहेर असलेल्या तरुणांचे लसीकरण प्रामुख्याने व्हायला हवे.
तरुणच ठरतील पुढच्या लाटेचे कॅरिअर्स
कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहर-ग्रामीणमधील पाच हजार 90 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसमुळे 103 रुग्ण दगावले आहेत. विशेष म्हणजे मृतांमध्ये 55 टक्के तरुण, कुटुंबातील कर्त्यांचा समावेश आहे. प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेले रुग्ण कोरोना झाल्यानंतर लगेचच बरे होतात, असे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रतिबंधित लस टोचली जात आहे. तरीही, तरुणांचा प्रतिसाद मिळत नसल्याने आगामी काळात त्यांच्या माध्यमातूनच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञ वर्तवित आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालयांमधील तरुणांचे लसीकरण व्हावे, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. परंतु, दिवाळी सुट्ट्या, तरुणांमधील गैरसमजामुळे अजून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचे लसीकरण व्हावे, असा प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. अभिजित जगताप, लसीकरण समन्वयक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.