गुन्हा घडल्यानंतर नव्हे तर गुन्हा घडूच नये म्हणून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'ग्रामसुरक्षा यंत्रणे'ची सुरवात केली.
सोलापूर : ग्रामसुरक्षा यंत्रणा अन् ऑपरेशन परिवर्तनची 'तेजस्वी' वाटचाल सुरू असून त्याचे यशही दिसून येत आहे. गुन्हा (Crime) घडल्यानंतर नव्हे तर गुन्हा घडूच नये म्हणून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी 'ग्रामसुरक्षा यंत्रणे'ची सुरवात केली. गावगाड्यातील लाखो व्यक्तींचे मोबाईल क्रमांक एकत्रित करून त्याचे ग्रुप तयार केले. त्यातून गावातील कोणतीही ऍक्टिव्हिटी असो वा संशयास्पद हालचालीची माहिती एकाचवेळी सर्वांना मिळू लागली. त्यातून गुन्हेगारीला आळा बसू लागला आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या 34 लाखांपर्यंत असून जवळपास साडेसातशे चौरस किलोमीटरपर्यंत जिल्ह्याची हद्द आहे. त्या तुलनेत पोलिस ठाणी व मनुष्यबळ कमीच आहे. तरीही, त्याची ओरड न करता पोलिस अधीक्षक सातपुते यांनी पोलिसिंगला लोकसहभागाची जोड दिली. राज्यातच नव्हे तर देशातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला. त्यातून अनेक ठिकाणची चोरी, दरोडा रोखण्यात यश मिळाले. शेतकरी असो वा सर्वसामान्यांच्या अडचणींवर मार्ग निघू लागला. खेडेपाड्यातील लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. दुसरीकडे अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांच्या मुलांनी मोठा अधिकारी, मोठा व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहावे. त्यासाठी अवैध व्यवसायातील लोकांना परावृत्त करण्यासाठी "ऑपरेशन परिवर्तन' सुरू केले.
सुरवातीला मुळेगाव तांड्याची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी, त्यांनी खूप अभ्यास केला. हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर वारंवार धाडी टाकल्या जातात, गुन्हेही दाखल होतात. तरीही, तो व्यवसाय सुरूच का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. महिन्यातून एक- दोनवेळा धाड टाकल्यानंतर उर्वरित 28-29 दिवस ते लोक व्यवसाय सुरूच ठेवायचे, हा निष्कर्ष पुढे आला. त्यावरच उपाय म्हणून त्यांनी दर तीन दिवसाला धाड टाकण्याचे नियोजन केले. अवैध व्यवसायातून पिढ्य्ापिढ्या बरबाद केलेल्यांच्यात परिवर्तन आणताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जोपासली. त्यांचे जीवन सुखी, समाधानी व्हावे, यासाठी त्यांनी बॅंकांनी अर्थसहाय्य करण्याचे आवाहन केले. मागील 40 दिवसांत 131 हातभट्टी व्यावसायिकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून त्यात सुशिक्षित तरुणांचाही समावेश आहे.
'ऑपरेशन परिवर्तन' हे सातत्याने सुरू राहणार आहे. त्यातून अवैध व्यवसायाचे तोटे काय, त्यातून कुटुंबाची परवड कशी होते, याबद्दल समुपदेशन केले जात आहे. दुसरीकडे, ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावातील प्रत्येकांमध्ये "आपण सुरक्षित आहोत' ही भावना निर्माण करणे हाच उद्देश आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
56 गावांमध्ये तयार होते हातभट्टी
'ऑपरेशन परिवर्तन'नंतर अवैध व्यवसायापासून परावृत्त झालेल्यांसाठी ठोस काय करता येईल, ते पुन्हा त्या व्यवसायाकडे जाणार नाहीत, यादृष्टीने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रयत्न केला. दुसरीकडे, अनेक वर्षांपासून हातभट्टी दारू बनविणारी गावे कोणती, ती दारू खरेदी करणारी गावे कोणती, याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. जिल्ह्यातील 56 गावांमधून तयार होणारी हातभट्टी दारू 102 गावांमध्ये विकली जाते, ही बाब समोर आली. त्यावर त्यांनी फोकस केला आणि प्रत्येक गाव एका अधिकाऱ्याकडे दत्तक दिले. या ऑपरेशनमुळेच पारंपरिक पद्धतीने अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडू लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.