सोलापूर : बालविवाहाची प्रथा कायद्याने बंद झाली, तरीही बालविवाह थांबलेले नाहीत. बालविवाहात सोलापूर राज्यात अव्वल असून, ही ओळख पुसण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नवीन ‘परिवर्तन’ ऑपरेशन हाती घेतले आहे. तीन वर्षांत ज्या गावांमध्ये बालविवाह रोखले किंवा झाले, अशा ७८ गावांची निवड करून प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दत्तक दिले आहे. त्यांना आठ दिवसांतून एकदा त्या गावाला भेट देणे बंधनकारक आहे.
महिला व बालविकास विभागाच्या ३ जून २०१३ च्या परिपत्रकानुसार ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकांनी ग्रामसेवकास मदत करणे अपेक्षित असतानाही तसे होताना दिसत नाही. अडीच वर्षांत चाईल्ड लाइनवरील माहितीवरून महिला बालकल्याणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने जवळपास १०० बालविवाह रोखले. मार्च २०२२ नंतर आतापर्यंत १५ बालविवाह रोखले गेले. गुपचूप पद्धतीनेही मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असतात. त्यामुळे ही प्रथा समूळ नष्ट व्हावी म्हणून ‘ऑपरेशन परिवर्तन’च्या धर्तीवर पोलिस अधीक्षकांनी नवीन ऑपरेशन हाती घेतले आहे. तीन वर्षांत ज्या गावांमध्ये बालविवाह रोखले किंवा झाले, अशा ७८ गावांची निवड करून प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दत्तक दिले आहे.त्याअंतर्गत पोलिस अधीक्षकांनी स्वत: नरखेड गाव दत्तक घेतले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांनाही गावे दत्तक दिली आहेत. परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक हे या ऑपरेशनचे नोडल अधिकारी आहेत. पहिल्या टप्प्यात प्रबोधनावर (जनजागृती) भर दिला जात असून त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
बालविवाह रोखलेली गावे
तिऱ्हे, वडाळा, मुळेगाव, बाणेगाव (उत्तर सोलापूर), पापरी, नरखेड, नजीकपिंपरी, कोन्हेरी, आष्टी, पेनूर, अनगर, बेगमपूर, कुरूल (मोहोळ), येळेगाव, मंद्रूप, शंकरनगर, तेलगाव, अकोले, होनमुर्गी, संजवाड, कुंभारी, शिर्पनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर), दोड्याळ, अंकलगी, करजगी, बादोले बु. (अक्कलकोट), बार्शी शहर, उंडेगाव, शेळगाव आर., आळजापूर, हत्तीज (बार्शी), अंजनगाव, भुताष्टे, धानोरे, वडशिंगे, मानेगाव, माढा, अकोले खु., बेंबळे, भेंड, कुर्डुवाडी, घाटणे, पिंपळनेर (माढा), भोसे, मेंढापूर, पंढरपूर शहर, अनवली, तारापूर, ओझेवाडी, कासेगाव, चळे, भटुंबरे, फुलचिंचोली, सरकोली, पखालपूर, पिराचीकुरोली, तिसंगी (पंढरपूर), यशवंतनगर, कन्हेर, कचरेवाडी, पठाण वस्ती, पिलीव, पिरळे, गिरवी, पिंपरी (ता. माळशिरस), उदनवाडी, जवळा, एखतपूर, पाचेगाव, महीम (सांगोला), चिक्कलगी, सलगर, शिरनांदगी, शिवणगी, मारापूर, बोराळे, लोणार, खुपसंगी (मंगळवेढा), गरे (करमाळा).
लोकचवळीतून थांबेल ही प्रथा
बालविवाहानंतर मुलींना तिच्या आयुष्यात अनेक वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. ही प्रथा बंद होण्यासाठी लोकसहभाग खूप महत्त्वाचा असून, ही प्रथा समूळ नष्ट होण्यासाठी लोकचळवळ उभारायला हवी. प्रायोगिक तत्त्वावर ७८ गावांची निवड करून त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.