सोलापूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी मध्यरात्री व रविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह वादळी वारे व अवकळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, आंबा या फळांसह रब्बी ज्वारी, गव्हू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गतवर्षीच्या अवकळी पाऊसातून बळीराजा सावरत असताना आज पुन्हा एकदा अवकळी पावसाने तडाका दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी कोलमडून पडला आहे. आंब्यांचा मोहर गळून पडला आहे तर द्राक्षे बागांमध्ये घडांचा अक्षरश: खच पडला आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी आपली द्राक्षे बेदाणे तयार करण्यासाठी शेडवर टाकली आहेत. याचेही मोठे नुकसान झाले आहे. डाळिंबाच्या बागांही फटका बसला असून ज्वारीची खळी, काढणी केले कांदा अवकळी पावसात वाहून गेला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकळी पावसामुळे झालेले नुकसान...
पंढरपूर तालुका
भारत नागणे : पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात आज सायंकाळी मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारी, गव्हू, हरभरा पिकांचे नुकसान झाले तर द्राक्ष आणि डाळिंब बागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील उपरी, सुपली, पळशी, गादेगाव, वाखरी, कासेगाव या भागात कमी अधिक प्रमाणात मेघगर्जनेसह पाऊस झाला. पावसामुळे शेतात व रस्त्यावर पाणी साचले होते. सुपली येथील बाळासाहेब पाटील यांच्या आंबा बागेचे नुकसान झाले आहे. तर या भागातील द्राक्ष आणि डाळिंबाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये बहार धरलेल्या डाळिंब बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. डाळिंब झाडांची फुल गळ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी ज्वारी, गव्हू, हरभरा यासह अन्य पिकांची नासाडी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा झाडांचा मोहर गळून पडला आहे. ज्वारीच्या कणसांमध्ये पाणी गेल्याने ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे.
सांगोला तालुका
दत्तात्रय खंडागळे : सांगोला तालुक्यातील अनेक भागात आज सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ज्वारी, हरभरा, डाळिंब व द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. ज्वारीच्या अनेक खळी अध्यापही पुर्ण झाल्या नाहीत. गेल्या अवकाळी पावसातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा अवकाळी सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाऱ्यामुळे ज्वारीची काढणी करून रानात पडलेला कडबा उडून गेला. या अवकाळीमुळे पिकाबरोबरच कडब्याचेही मोठे नुकसान होणार आहे. द्राक्ष व डाळींब फळबागांवर या रोगट वातावरण व अवकाळी पावसामुळे रोगराईमध्ये वाढ होणार आहे. उशिरा धरलेल्या डाळिंब बागांना सेटिंग व कळी अवस्थेत असणाऱ्या बागांची फुलगळती व कुजवा या रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे.
हेही वाचा - काही मिनिटात उद्धवस्त झाली द्राक्ष बाग
मंगळवेढा तालुका
हुकुम मुलाणी : मंगळवेढा तालुक्यात अवकाळी पावसाने आंबा, ज्वारी, द्राक्षासह डाळिंब पिकांचे नुकसान झाले. शनिवारी झालेल्या पावसात बोराळे महसूल मंडल येथे नऊ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. रात्रीच्या पावसाने काढलेल्या ज्वारीचे नुकसान झाले. याशिवाय आंब्याच्या झाडाला मोहोर असून अवकाळी पावसाने तो गळून फटाका बसला. तर, काही ठिकाणी द्राक्ष बागेचे नुकसान झाले. आज दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचे ढग तालुक्यावर होते. सायंकाळच्या सत्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह मारोळी, शिरनांदगी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी संबंधित गावातील मंडल अधिकारी व तलाठ्यांना याबाबत दक्ष असावे अशा सूचना दिली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयास सादर करावेत असे सांगितले.
माढा तालुका
किरण चव्हाण : माढा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष बागा, बेदाणा तसेच ज्वारी व कडब्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गाला मोठा आर्थिक फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे माढा परिसरातील वीजपुरवठा 12 तासांपेक्षा अधिक काळ खंडित झाला होता. माढा तालुक्यातील माढा, उपळाई खुर्द, खैरेवाडी, मानेगाव परिसरातील बेदाणे भिजल्याने व द्राक्ष बागा पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. उपळाई खुर्द येथील राजकुमार टीपे, श्रीरंग कदम यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तसेच नामदेव जाधव, सोमनाथ जाधव यांची द्राक्ष बागच वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली आहे. उपळाई खुर्द येथील लहू बोराडे, औदुंबर कोल्हे, बाळासाहेब अनभुले यांचे बेदाणा शेड भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चिंचोली येथील गहिनीनाथ बाबूराव लोंढे यांच्या कडब्यावर वीज पडल्याने दीड हजार कडबा जळून खाक झाला. याशिवाय तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पाऊस झाल्याने बागवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे.
मोहोळ तालुका
राजकुमार शहा : मोहोळ तालुक्यात अचानकपणे वादळी वाऱ्यासह रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने आंबा, चिक्कू पिकांचे नुकसान झाले असून गारपिटीच्या भीतीने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी लहान गारा पडल्याचे वृत्त आहे. पावसाबरोबर जोरदार वारे असल्यामुळे आंब्याच्या झाडाचा मोहोर पूर्ण गळाला आहे. तर, लहान लहान कैऱ्याही पडल्या आहेत. त्यामुळे आंबा उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. मोहोळ तालुक्यातील अनेक गावात द्राक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेतील घड उतरणीस आले आहेत. लाखो रुपये खर्च करून आणलेल्या द्राक्षबागांचे पीक हातचे जाते की काय या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.
हेही वाचा : राज्यातील 40 हजार शिक्षकांचे सभागृहाकडे लक्ष
बार्शी शहर व तालुका
प्रशांत काळे : बार्शी शहर व तालुक्यात शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह विजेच्या कडाकडाटात सुमारे 20 मिनिटे अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे कांदा, ज्वारी, हरभरा, गहू या पिकांचे तर द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. शनिवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर उष्ण हवामान, उकाडा जाणवत होता. रात्री सव्वाबाराच्या दरम्यान वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. शेतामध्ये ज्वारी, हरभरा काढणी करून ठेवला आहे. यावर पाऊस पडला तर हरभरा, ज्वारी काळी पडते. भाव मिळत नाही. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाईल, अशी परिस्थिती पावसामुळे झाली आहे. नारी येथील लालासाहेब गवळी यांची व हिंगणीचे सरपंच बिभीषण माळवदे यांची विक्रीसाठी तयार असलेली दीड एकर क्षेत्रावरील 25 टन द्राक्षबागा वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे लोखंडी चॅनल वाकवून जमिनीकडे झुकल्यामुळे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
उपळाई खुर्दमध्ये लाखोंचे नुकसान
अक्षय गुंड : माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे गारांचा पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. उपळाई बुद्रूक, उपळाई खुर्द, भुताष्टे, बावी, रोपळे, चिंचोली परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग इतका मोठा होता, की परिसरातील बऱ्याच घरांवरील पत्रे उडून गेली तर अर्धा तास विजेचा कडकडाट सुरू होता. यात चिंचोली येथील समाधान लोंढे या शेतकऱ्याच्या कडब्याच्या गंजीवर वीज कोसळून कडबा जळून खाक झाला. उपळाई खुर्द येथे एक तासाहून अधिक वेळ वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने प्रभाकर श्रीपती जाधव यांच्या अडीच एकर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे. काढायला आलेली द्राक्षाचे घड खाली पडले आहेत. मच्छिंद्र दत्ता जाधव यांच्या तीन एकर द्राक्षबागेचे नुकसान झाले असून सोमनाथ सारंग जाधव यांच्या दीड एकर बागेचा काही भाग कोसळून भुईसपाट झाला. नामदेव श्रीपती जाधव व भारत श्रीपती जाधव यांच्याही बागेचे अतोनात नुकसान झाले. साधारणपणे या भागातील प्रत्येक द्राक्ष बागायतदारांचे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले.
नरखेडमध्ये 13 लाखांचे नुकसान
गो. रा. कुंभार : नरखेड (ता. मोहोळ) परिसरात शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात नरखेड येथील गोवर्धन शिंदे यांचे दोन एकर द्राक्षबाग जमीनदोस्त झाली. काढणीला आलेल्या अवस्थेतील द्राक्षबागेचे सुमारे 13 लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतकरी रात्री गाढ झोपेत असताना वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस शेतकऱ्यावर चांगलाच कोपला आहे. नुकसानीची पाहणी तलाठी श्री. मोटे यांनी केली.
वाळूज परिसरात हरभरा पिकांचे नुकसान
रमेश दास : वाळूज (ता. मोहोळ) परिसरातील देगाव, भैरववाडी, मनगोळी शिवारात रात्री 12 वाजून 10 मिनिटांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल. वाळूजसह देगाव, भैरववाडी, मनगोळी, भागाईवाडी, येलमवाडी शिवारात शेकडो एकर क्षेत्रावर सध्या द्राक्षबागा उभ्या असून काढणीयोग्य व पक्व झालेल्या द्राक्षाचा माल उतरणीचा हंगाम सुरू आहे. अशातच अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात लावल्या हजेरीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला.
मानेगावात बेदाणा भिजला
वैभव देशमुख : माढा तालुक्यातील मानेगाव परिसरात शनिवारी रात्री साडेअकरा ते एक वाजेपर्यंत ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे मानेगाव, धानोरे, कापसेवाडी, बुद्रूकवाडी, केवड, वाकाव येथील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. मानेगाव परिसरात द्राक्ष बागांचे मोठे क्षेत्र आहे. पावसाने बागेत द्राक्ष मनी मोठ्या प्रमाणात पडले आहेत. शेतकऱ्यांसाठी विशेषतः द्राक्ष बागायतदारांसाठी हा पाऊस मोठे लाखो रुपयांचे नुकसान करणारा ठरणार असल्याने शेतकरी चिंताक्रांत आहेत. सध्या द्राक्षे काढणीचा हंगाम चालू असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आपली द्राक्षे बेदाणे तयार करण्यासाठी शेडवर टाकलेली आहेत. अचानक आलेल्या पावसाने बेदाणा भिजल्याने हनुमंत पाचफुले, रणजित शेळके यांचे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.