Solapur News : पंढरपुरात भालकेंचा प्रवेश, सोलापूर शहरात चाचपणी; भाजप-काँग्रेसच्या १४ माजी नगरसेवकांशी संपर्क
सोलापूर : पंढरपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांन ‘बीआरएस’मध्ये खेचून आणण्यात तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यशस्वी झाले आहेत. तत्पूर्वी, त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांना पक्षात घेतले होते.
आता माजी खासदार स्व. लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांना पक्षात येण्याची गळ घातली जात आहे. दुसरीकडे काँग्रेस व भाजपमधील १२ ते १४ माजी नगरसेवकांशी देखील फोनवरून सकारात्मक चर्चा झाल्याचे वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
तेलंगणचे मुख्यमंत्री नांदेड, औरंगाबाद, धाराशिव, सोलापूरसह महाराष्ट्रातील इतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, तेलुगु भाषकांची संख्या लक्षणीय आहे, अशा जिल्ह्यांमध्ये पहिला फोकस दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यात त्यांनी मोठी दमदार एन्ट्री केली असून त्यांच्यासोबत तेलंगणचे अख्खे मंत्रिमंडळ आणि तब्बल तीनशेहून अधिक गाड्यांचा ताफा होता. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर सरकोलीतील कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली आणि त्यावेळी माजी आमदार स्व. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना ‘बीआरएस’मध्ये प्रवेश दिला.
तत्पूर्वी, सोमवारी (ता. २६) त्यांचा हॉटेल बालाजी सरोवरमध्ये मुक्काम होता. त्यांनी माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा देखील केली. त्यावेळी त्यांनी आपल्या पक्षात कोण-कोण माजी नगरसेवक येऊ शकतात, याचा अंदाज घेतला.
त्यानंतर तेलंगणचे वित्तमंत्री नागेश वल्याळ यांच्या भेटीला गेले. तर दुसरीकडे माजी आमदार विश्वनाथ चाकोते, राजशेखर शिवदारे, आप्पाशा म्हेत्रे, रवी पाटील, सुभाष मुनाळे, कोमल साळुंखे, पुरुषोत्तम पोबत्ती, अंबादास बिंगी व राजू राठी यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली.
महापालिका निवडणुकीपूर्वी अनेकजण ‘बीआरएस’मध्ये येतील
महापालिका निवडणुकीला अजून वेळ आहे, त्यामुळे आताच पक्षप्रवेश केल्यास पक्षातून दबाव येऊ शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकांनी पक्षांतरासाठी वेळ मागितला असून निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांतील अनेकजण ‘बीआरएस’मध्ये दिसतील, असा विश्वास माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, माजी महापौर महेश कोठे यांची भूमिका मुख्यमंत्री केसीआर यांनी यापूर्वीच जाणून घेतली होती. त्यामुळे सोलापूर दौऱ्यात त्यांची भेट घेतली गेली नसावी, अशीही चर्चा होती.
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे व कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनीही केसीआर यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांच्या भेटीसाठी व त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.
‘बीआरएस’चे टार्गेट शेतकरी अन् वंचित घटक
‘अब की बार किसान सरकार’चा नारा देत बीआरएस आता महाराष्ट्रात पाय घट्ट रोवण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. राज्यातील शेतकरी आणि वंचित घटकांवर ‘बीआरएस’ने सर्वाधिक फोकस केला आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज, पेरणी-मशागतीसाठी अनुदान, शेती अवजारांसाठी ९० टक्के सबसिडी आणि वंचित घटकातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी दहा लाखांचे कर्ज,
सरकारतर्फे शेतकऱ्यांचा मोफत अपघाती विमा, अशा मुद्द्यांवर त्यांनी शेतकऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा पक्ष कोणासाठी प्रमुख अडसर ठरणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.