बदलीनंतर त्यांच्याकडे पुण्यातील अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.
सोलापूर: पंढरपूरचे प्रातांधिकारी सचिन ढोले यांची नुकतीच बदली झाली. त्यांनी पंढरीतील दर्शन व्यवस्था अपग्रेड करण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळातील आषाढी, कार्तिकी वाऱ्यांचे नियोजन, अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यात यश मिळविले. बदलीनंतर त्यांच्याकडे पुण्यातील अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.
महसूल विभागाने शुक्रवारी प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, अशा दहा अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. बदलीनंतर पदस्थापनेच्या ठिकाणी पदग्रहणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या धरुन तयारी व प्रवासासाठी सात दिवसांचा कालावधी दिला जातो. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी 9 ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त होणे अपेक्षित आहे. 9 ऑगस्टपर्यंतचे त्यांचे वेतन त्याच ठिकाणाहून काढले जाणार आहे. त्यानंतरचे वेतन मात्र, बदली झालेल्या ठिकाणाहून निघेल, असेही महसूल विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पदग्रहण कालावधी समाप्त होण्याअगोदर बदलीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आदेशातून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे तो कालावधी अनुपस्थितीचा (अकार्यदिन) समजण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तीन तहसिलदारांच्याही महसूल विभागाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अक्कलकोटच्या तहसिलदार अंजली मरोड यांच्याकडे रोजगार हमी योजनेचा चार्ज देण्यात आला आहे. तर श्रीकांत पाटील यांच्याकडे इंदापूरचे तहसिलदार म्हणून तर मोहोळचे तहसिलदार जीवन बनसोडे यांची संख (ता. जत, जि. सांगली) येथील अप्पर तहसिलदार म्हणून बदली झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या विभागाबाबत वरिष्ठ अनभिज्ञ
एक वर्षापूर्वी जिल्हा प्रशासनातील महसूल विभागातील तहसिलदारपदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती झाली. त्याचवेळी त्यांच्याकडे सामान्य प्रशासनाच्या तहसिलदारपदाचाही अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, वर्षापूर्वी त्यांची बदली अन्नधान्य वितरण विभागात करण्यात आली. मात्र, महसूल विभागाचे तहसिलदार म्हणून त्यांना कार्यमुक्त केले नाही. वास्तविक पाहता मागील वर्षीच्या आदेशानुसार पाटील हे अन्नधान्य वितरण विभागाचे तहसिलदार होते. तरीही, महसूल विभागाच्या आदेशात श्रीकांत पाटील हे महसूलचे तहसिलदार असा उल्लेख असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्याच विभागातील अधिकाऱ्यांबद्दल माहिती नसल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.