सोलापूर : गेल्या नऊ वर्षात देशातील २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हे २५ कोटी लोक आता माझे साथीदार आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या स्थानावर नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील सभेत पुन्हा एकदा बोलून दाखविला.
सोलापुरातील रे नगर येथील कामगारांच्या घरांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रकल्पाचे संकल्पक नरसय्या आडम व्यासपीठावर उपस्थित होते.
सोलापूर येथील कुंभारीच्या रे नगर येथे असंघटित कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात पंधरा हजार घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पाच कामगारांना मोदी यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, गरिबीतून बाहेर पडलेल्या या २५ कोटी जनतेला आणखी आर्थिक ताकद देण्याची गरज आहे. या नागरिकांना ताकद न दिल्यास ते पुन्हा गरिबीमध्ये जातील. यापूर्वी गरिबी हटावसाठी अनेक घोषणा झाल्या.
आधी रोटी खाएंगे, व्होट उन्ही को देंगे अशा पध्दतीच्या घोषणा पूर्वी दिल्या जात होत्या. मोदी है, पुरी रोटी खाएंगे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पूर्वीच्या सरकारमध्ये गरिबांच्या नावावर आलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या.
त्या योजना मध्येच हडप केल्या जात होत्या. आमचे सरकार आल्यापासून आम्ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लाभ देण्यास सुरुवात केली आहे. गरिबांच्या नावावर योजना लाटणाऱ्या १० कोटी बोगस लाभार्थ्यांना आम्ही बाजूला केले असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड भावूक झाले. रे नगर येथील घरे जेव्हा मी पाहिली. त्यावेळी वाटलं की, आपल्यालाही लहानपणी राहायला असे घर मिळालं असते तर...हे वाक्य उच्चारतचा मोदी प्रचंड भावूक झाले. त्यांचा गळा दाटून आला... त्यांना पुढे शब्दही फुटेना....लहानपणीचे दुःख आठवून मोदी दोन मिनिटे बोलू शकले नाहीत.
एवढे मोदी भावूक झाले होते. पुढची काही मिनिटे ते कातर स्वरातच बोलत होते. पीएम आवास योजनेतील सर्वांत मोठ्या गृहप्रकल्पाचे आज लोकार्पण होत आहे. मी जेव्हा ही घरे पाहून आलो, त्यावेळी वाटलं की, आपल्यालाही लहानपणी असे घर मिळालं असते तर...
हे वाक्य उच्चारताच मोदी प्रचंड भावूक झाले. त्यांचा गळा दाटून आला...मोदी यांना पुढे शब्दच फुटेना....मोदी दोन घोट पाणी प्यायले. लहानपणीचे दुःख आठवून मोदी दोन मिनिटे बोलू शकले नाहीत. एवढे मोदी भावूक झाले होते. पुढे कातर स्वरातच मोदी हे काही वेळ बोलत होते.
मोदी म्हणाले की, महाराष्ट्राचा गौरव माझ्यामुळे वाढत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हे ऐकायला चांगलं वाटतं. राजकारण्यांना तर ते अधिक चांगलं वाटतं. पण, श्रीमान शिंदेजी... महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टामुळे आणि प्रगतीशिल सरकारमुळे महाराष्ट्राचे नाव देशात उंचावत आहे.
कामगारांसाठी आम्ही जो संकल्प केला होता, तो आज पूर्ण होत आहे. ही घरे जेव्हा मी पाहतो. त्यावेळी मनाला प्रचंड आनंद वाटतो. हजारो कुटुंबांचे स्वप्न साकार होत आहे, या कामगारांचे आशीर्वाद हीच माझी सर्वांत मोठी पुंजी आहे. मी जेव्हा या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. त्याचवेळी मी घरांची चावी देण्यासाठी मीच येईन, अशी ग्यारंटी दिली होती. मोदींनी ती ग्यारंटी पूर्ण केली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.