सोलापूर : शहरातील विविध मिरवणुकांमध्ये सार्वजनिक मंडळांकडून साउंड सिस्टिमसोबत प्लाझमा, बीम लाइट व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण, त्यामुळे वाहन चालकांचे डोळे दिपून चालकांचे नियंत्रण सुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मिरवणूक पाहायला आलेल्या लहान मुले, वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यास इजा होऊन डोळे कायमचे निकामी होवू शकतात. या पार्श्वभूमीवर त्या लाईटवर पोलिसांनी निर्बंध घातले असून त्याचा वापर करणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे.
सोलापूर शहरात ३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव साजरा होत आहे. सोलापूर शहरात साधारणत: ४०० सार्वजनिक मंडळे स्थापन होतील आणि त्यातील १८५ मंडळे मिरवणुकीने मंडळाची स्थापना करतात. १२ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी अनेक मंडळे मिरवणुकीने शक्तीदेवीची स्थापना करतात. त्याचदिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तही मिरवणुका निघतात. त्यावेळी अनेक मंडळांकडून साउंड सिस्टिमसोबतच प्लाझमा, बीम लाइट व लेझर बीम लाईटचा वापर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३मधील कलम १६३ प्रमाणे सोलापूर शहराच्या हद्दीत त्या लाईटचा वापर करता येणार नाही, असे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढले आहेत. गुरुवार (ता. ३) सकाळी नऊ ते १३ ऑक्टोबरच्या सकाळी १० वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
लेझर व बीम लाईटचे धोके
सोलापूर शहर उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखले जाते आणि सोलापूर शहरात सर्वाधिक उत्सव साजरे होतात असेही म्हटले जाते. त्यावेळी मिरवणुकांमध्ये डीजे साउंड सिस्टिमसोबत प्लाझमा, बीम लाइट व लेझर बीम लाईटचा वापर केला जातो. मात्र, मिरवणुका पाहायला आलेल्या लहान मुलांना, वृद्धांना त्याचा त्रास होतो. त्या लाईटमुळे डोळ्यास इजा होऊन ते कायमचे निकामी होवू शकतात. त्या लाईटमुळे डोळ्याला अंधारी येते आणि त्यातूनच गंभीर धोका होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी अशा लाईटवर आता मिरवणुकांमध्ये निर्बंध घातले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.