येथील जुळे सोलापुरातील रोहिणी नगर परिसरात एका महिलेच्या घरातील वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला.
सोलापूर : येथील जुळे सोलापुरातील (Jule Solapur) रोहिणी नगर परिसरात एका महिलेच्या घरातील वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा (Police Raid) टाकला. तत्पूर्वी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. या प्रकरणात अनुराधा राजदत्त वडतिले या महिलेसह दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. वडतिले या महिलेने त्या दोघींना वेश्या व्यवसायास भाग पाडले. या प्रकरणी अनुराधा वडतिलेविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.
अडचणीतील महिलांना पैशाचे आमिष दाखवून अनुराधा वडतिले हिने दोन महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्या दोघींची शारीरिक पिळवणूक करून त्यांच्या कमाईवर स्वत:ची उपजीविका करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जुळे सोलापूर या शांत व सभ्य लोकांच्या वसाहतीत कुंटणखाना सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने परिसरातील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने त्या दोन पीडित महिलांची सुटका केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार राजेंद्र बंडगर, वर्षा लटके, महादेव बंडगर, अर्चना गवळी, ज्योती मोरे, नफिसा मुजावर, तृप्ती मंडलिक, रमादेवी भुजबळ, दादा गोरे यांच्या पथकाने केली.
अडचणींमुळे वाढतोय वेश्या व्यवसाय
मार्च 2020 पासून कोरोनाचे संकट पूर्णपणे हद्दपार झालेले नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध लागू केल्याने अनेकांसमोरील विशेषत: हातावरील पोट असलेल्यांच्या अडचणी वाढल्या. अनेकांचे व्यवसाय बंद पडले तर अनेकांचा रोजगार गेला. या पार्श्वभूमीवर पैसे मिळविण्यासाठी वेश्या व्यवसाय वाढू लागल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दवाखान्याला गेल्यावर चोरट्याने केली चोरी
आजारी असल्याने दवाखान्यात गेल्यानंतर चोरट्याने बंद घर फोडून घरातील सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना न्यू पाच्छा पेठेतील चंदामामा अपार्टमेंटमध्ये घडली. राजेश्री अंबादास बोळकोटे (रा. न्यू पच्छा पेठ, अशोक चौक) यांनी तशी फिर्याद जेलरोड पोलिसांत दिली.
फिर्यादी राजेश्री यांच्या पायाला सूज आल्याने मंगळवारी (ता. 17) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या दवाखान्यात गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले आणि अशोक चौकातील खासगी दवाखान्यात गेल्या. औषधोपचार करून दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घरी परतल्या. त्या वेळी त्यांना घराचे लोखंडी गेट उघडलेले आणि दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. घराचे कुलूप जवळील झाडांच्या कुंडीत पडलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन बेडरूममधील कपाट उघडून पाहिले, त्यावेळी त्यांना कपाटातील एक लाख 50 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या, 30 हजार रुपयांची सोन्याची कर्णफुले, 15 हजार रुपयांचे कानातील झुमके, 30 हजारांचे कानातील वेल, असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी तत्काळ जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक बादोले हे पुढील तपास करीत आहेत.
खरेदी करताना वृद्धेची पळविली पर्स
येथील नवी पेठ परिसरात साहित्य खरेदीवेळी एका वृद्ध महिलेची पर्स त्यांची नजर चुकून चोरट्याने लांबविली. ही घटना नवी पेठ ते टिळक चौक परिसरात घडली. या प्रकरणी ज्योत्स्ना जगदीश जाधव (रा. नेरुळ पोलिस ठाणे, सेक्टर नेरूळ, ठाणे) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांची भावजय मिळून नवी पेठ ते टिळक चौकात खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांची नजर चुकवून पर्स चोरली. त्या पर्समध्ये आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल व सात हजार रुपयांची रोकड, असा 15 हजार रुपयांचा ऐवज होता. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शिंदे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.