सांगोला म्हटले की, आजपर्यंत कायमच शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघातून एकाच पक्षातून गणपतराव देशमुख यांनी तब्बल ११ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या बालेकिल्ल्याला आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत सुरुंग लावला होता. अल्पशा मतात सांगोल्यात शेकापचा पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षांमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. 2019 चे शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख शिक्षणासाठी बाहेर गेल्यामुळे तालुक्यात गणपतआबांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले.