सोलापूर : ‘ईडी’च्या माध्यमातून सातत्याने माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांना भाजपने सतत मानसिक त्रास दिला. त्यांना सतत त्रास दिला आणि हताश होवून त्यांनी पक्ष सोडल्याचा आरोप पक्षाच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांचे वडिल देखील राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या पत्नीही आमदार होत्या. ते पक्ष सोडतील असे कोणालाच वाटले नाही, पण भाजपने त्यांच्या बाबतीत माईंड गेम खेळून त्यांना पक्ष सोडायला मजबूर केल्याची टीका आमदार प्रणितींनी यावेळी केली. काँग्रेस हा विचार असून तो भाजप कधीही संपवू शकणार नाही. पक्ष संघटना मजबूत असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे राज्यात भाजपला हिसका दाखवू, असा इशााराही
त्यांनी दिला. विरोधकांबद्दल अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करून भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. प्रेशर टॅक्टीस वापरून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून भाजप आपल्याकडे घेत आहे. जनतेच्या बाबतीतही १५ लाख रूपये खात्यात टाकू,
दरवर्षी दोन कोटी रोजगार देवू असे भावनिक राजकारण भाजपने केले. पण, जनतेला आता ते लक्षात आल्याने भाजपला त्याचा फटका बसेल
म्हणूनच ‘ईडी’च्या माध्यमातून असे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आमच्याकडे काही संस्था नाहीत, त्यामुळे आम्हाला ‘ईडी’ची भीती नाही आणि
आम्ही काँग्रेस सोडणार नाही. भाजपकडून अफवा पसरविल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाविकास आघाडी भक्कम असून राज्यात सर्वाधिक जागा आम्हीच जिंकू, असा विश्वास देखील आमदार प्रणितींनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघापैकी ‘शहर मध्य’ हा मतदारसंघच सध्या काँग्रेसकडे आहे. आमदार प्रणिती शिंदे या एकमेव विरोधी पक्षाच्या आमदार जिल्ह्यात आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे या भाजपमध्ये आल्यास जिल्ह्यात काँग्रेसचा कोणताच मोठा नेता आपल्याला विरोध राहणार नाही.
तसेच मागील दोन्ही खासदारांबद्दल जनतेत नाराजीचा सूर असून शिंदेंना भाजपमध्ये आणल्यास सोलापूर लोकसभेची निवडणूक एकहाती जिंकता येईल, असा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
इंडिया शायनिंगच्या वेळी देखील मागे असाच प्रकार भाजपकडून करण्यात आला होता. पण, त्यावेळी मोठ्या जिद्दीने आम्ही लढलो आणि जनतेने आम्हाला सत्तेत बसविले. आता देखील भाजपने काहीही केले तरी आमची पुन्हा सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.