प्रणिती शिंदे गेल्या दिल्लीला अन्‌ त्यांच्या मतदारसंघात उमेदवारी हवीय प्रत्येकाला! काँग्रेसपुढे MIM, माकपसह बंडखोरीचे आव्हान; शहर मध्यचे ‘हे’ आहेत संभाव्य उमेदवार

शहर मध्य मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक केलेल्या प्रणिती शिंदे आता खासदार झाल्या आणि दिल्लीला गेल्या. त्यानंतर काँग्रेसमधील मोची, मुस्लिम कार्यकर्त्यांना उमेदवारी खुणावू लागली व त्यांनी तशी मागणी देखील पक्षाकडे केली. काही माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात स्वत:चे फलक भावी आमदार म्हणूनही झळकवले.
solapur
praniti shindesakal
Updated on

सोलापूर : शहर मध्य मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक केलेल्या प्रणिती शिंदे आता खासदार झाल्या आणि दिल्लीला गेल्या. त्यानंतर काँग्रेसमधील मोची, मुस्लिम कार्यकर्त्यांना उमेदवारी खुणावू लागली व त्यांनी तशी मागणी देखील पक्षाकडे केली. काही माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात स्वत:चे फलक भावी आमदार म्हणूनही झळकवले. तर ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, नाहीतर वेळप्रसंगी बंडखोरीचाही इशारा दिला आहे. परंतु, इंडिया आघाडीत ‘शहर मध्य’मधून ‘माकप’चे माजी आमदार नरसय्या आडम यांना उमेदवारीची आशा होती. पण त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री होताच त्यांनी आता स्वत:च्याच पक्षाकडून लढण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्षांनी देखील या मतदारसंघावर दावा केला आहे, पण त्यांनाही अद्याप तो तिढा सोडविता आलेला नाही.

सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. मोची समाजाचे मतदान देखील लक्षणीय आहे. या सर्वांची घडी बसवून त्यांच्या मदतीने आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी लाटेतही विजय मिळवला आणि २०१९च्या निवडणुकीत विजयाची हॅट्रिकही साधली. त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक आनंद या मतदारसंघातील काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांना झाला होता.

आता विधानसभेला येथून आपलाच आमदार होणार, अशी आशा त्यांना होती. त्यामुळे त्यांनी लोकसभेला प्रणिती शिंदे यांना मदत केली. ‘शहर मध्य’मधून १९ पैकी १३ इच्छुक मुस्लिम असून त्यांनी आमच्यापैकी कोणाही एकाला उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरला आहे. पण, ‘एमआयएम’कडून फारूक शाब्दी आणि ‘माकप’चे आडम मास्तरही येथून निवडणूक लढणार असल्याने काँग्रेस नेत्यांसमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. अशावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते.

शिवसेना-भाजप युतीला मोठी संधी

२००९, २०१४ व २०१९ या तिन्ही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचाच विजय झाला. पण, दोघांची भांडणे अन्‌ तिसऱ्याचा लाभ, अशीच स्थिती या निवडणुकांमध्ये राहिली. २००९च्या निवडणुकीत माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांनी ३४ हजार ६६४ तर शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडेंनी २६ हजार ५६२ मते घेतली. प्रणिती शिंदे यांना ६८ हजार २८ मते मिळाली आणि त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. २०१४च्या मोदी लाटेत प्रणिती शिंदेंना ४६ हजार ९०७ मिळाली, तरीदेखील त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या. यावेळी एमआयएमचे तौफिक शेख यांनी ३७ हजार १३८, महेश कोठेंनी ३३,३३४ आणि भाजपच्या मोहिनी पत्की यांनी २३,३१९ मते घेतली. या तिघांच्या लढतीत चौथ्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी बाजी मारली. २०१९च्या निवडणुकीत आडम मास्तरांनी १०,५०५, दिलीप माने यांनी २९,२४७, महेश कोठेंनी ३०,०८१, फारूक शाब्दींनी ३८,७२१ मते घेतली होती. तरीपण, तिसऱ्यांदा प्रणिती शिंदेंनीच बाजी मारली. आता २०२४च्या निवडणुकीत त्या स्वत: उमेदवार नसल्याने येथे भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराला विजयाची मोठी संधी असणार आहे.

प्रमुख पक्षातील संभाव्य उमेदवार...

  • काँग्रेस : चेतन नरोटे

  • शिवसेना : ज्योती वाघमारे (शिवसेनेला मतदारसंघ सुटल्यास)

  • माकप : नरसय्या आडम

  • एमआयएम : फारूक शाब्दी

‘शहर मध्य’साठी एवढा हट्ट का?

दक्षिण सोलापूर व सोलापूर शहर उत्तर या दोन मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे सोलापूर शहरातील राजकारणात भाजपचे पारडे जड असून मागच्यावेळी भाजपचीच सत्ता महापालिकेवर होती. त्यामुळे पक्षवाढ व शहरातील राजकारणात प्राबल्य निर्माण करण्यासाठी महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला देखील ‘शहर मध्य’ची जागा हवी आहे. याठिकाणी आपला आमदार निवडून आल्यास सोलापूर शहरातील राजकारणावर आपली देखील पकड मजबूत होऊ शकते व पुढे त्याचा सकारात्मक परिणाम महापालिका निवडणुकीतही होईल, अशी आशा दोन्ही पक्षांना आहे.

Related Stories

No stories found.