सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन केलेली उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजना ठेकेदारांच्या वादात अडकली आहे. पहिला ठेका रद्द केलेल्या हैदराबादच्या पोचमपाड कंपनीने काम करण्याची इच्छा व्यक्त करीत पुण्याच्या लवादाकडे धाव घेतल्याने कोल्हापूरच्या ‘लक्ष्मी’ला वर्क ऑर्डर देऊनही तीन महिन्यांपासून काम बंदच आहे. पण, राजकीय मध्यस्थीने आता दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम पूर्ण करतील, अशी माहिती महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सोलापूर शहराची २०५० साली ३५ लाख लोकसंख्या गृहीत धरून १७० दशलक्ष लिटर क्षमतेची, १२० किलोमीटर उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजना आता नव्याने तयार केली आहे. त्यासाठी ६३९ कोटी रुपये लागणार आहेत. तत्पूर्वी ‘एनटीपीसी’कडून मिळालेले २५० कोटी आणि ‘स्मार्ट सिटी’चे २०० कोटी, अशा एकूण ४५० कोटींची ११० दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी मंजूर होती. १८ महिने मुदतीत पूर्ण करण्याच्या कामाचा ठेका ‘पोचमपाड’ कंपनीला मिळाला आणि त्यांनी कामाचा श्रीगणेशाही केला.
परंतु, कंपनीने किंमतवाढ मागितली आणि त्या ठेकेदाराचा मक्ता रद्द करण्यात आला. त्यानंतर नवीन कामाचा ठेका कोल्हापूरच्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला मिळाला आणि त्यांनी लगेचच काम सुरू केले. परंतु, ‘पोचमपाड’ने काम करण्याची इच्छा व्यक्त करीत लवादाकडे धाव घेतली आणि थेट मंत्रालयातून हालचाली झाल्या. इकडे सोलापुरातही उलटे चक्र फिरले आणि ‘लक्ष्मी’चे काम कोणतेही सबळ कारण न देता थांबविण्यात आले. त्यावर मध्यम मार्ग काढण्याच्या मंत्रालयात हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. प्रलंबित काम निवडणुकांपूर्वी सुरु व्हावे, यादृष्टीने दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करतील, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.
‘एमजेपी’चा पुन्हा नवीन ‘डीपीआर’
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) माध्यमातून सोलापूर महापालिकेने ‘अमृत-२’ योजनेतून सुरवातीला ११० एमएलडीनुसार ५३२ कोटींचा कृती आराखडा (डीपीआर) राज्य सरकारला सादर केला. त्यातील त्रुटींच्या पूर्ततेसाठी तो पुन्हा महापालिकेला पाठविण्यात आला. मात्र, आता समांतर जलवाहिनीची क्षमता १७० एमएलडी केल्याने ‘एमजेपी’चा डीपीआर पुन्हा नव्याने तयार केला जात आहे. सहाशे कोटींच्या त्या ‘डीपीआर’साठी साधारणतः: तीन महिन्यांचा अवधी लागेल. योजनेचा निधी मिळाल्यानंतर तीन वर्षांत सर्व कामे होतील, अशी माहिती पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
कडक उन्हाळ्यात पण ४-५ दिवसाआडच पाणी
सोलापूर जिल्ह्यात सध्या भाजपचे वर्चस्व असून गतवर्षी महापालिकेवर भाजपचीच सत्ता होती. सध्या केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार आहे. तत्पूर्वी, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर होती. सत्ताधारी बदलले, पण सोलापूरकरांना नियमित किंवा एक-दोन दिवसाआड पाणी मिळू शकले नाही. आता कडक उन्हाळ्यात देखील चार ते पाच दिवसाआड पाणी मिळत असून अंतर्गत पाइपलाइन दुरुस्तीशिवाय त्यात बदल होऊ शकत नाही, अशी माहिती पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.