नेरळ-माथेरान येथे आवश्यक विशेष प्रवासी कोचची निर्मिती करणाऱ्या कुर्डुवाडी येथील रेल्वे कोच तयार करण्याच्या कामाचा वाटावा इतका अभिमान कमीच आहे.
नेरळ-माथेरान येथे आवश्यक विशेष प्रवासी कोचची निर्मिती करणाऱ्या कुर्डुवाडी येथील रेल्वे कोच तयार करण्याच्या कामाचा वाटावा इतका अभिमान कमीच आहे. या कारखान्यातील कामगार संख्येत होऊ लागलेली वाढ अगदी कासवगतीची आहे. कुर्डुवाडी परिसराचा कायापालट होण्यासाठी व कारखान्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी प्रवासी कोचच्या कामासह इतर कामे मिळणे व मोठ्या प्रमाणात कामगार भरती होण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्रीय पातळीवर जोरदार प्रयत्नांची गरज आहे. येथील काम वाढले व कामगार संख्येत लक्षणीय वाढ झाली तर कुर्डुवाडीला पुनर्वैभव प्राप्त होईल.
स्वातंत्र्यपूर्व काळातही महत्त्व अधोरेखित असलेल्या व सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमान वाटावा अशा कुर्डुवाडीने गेल्या काही वर्षांत विकासाची गती म्हणावी तशी घेतली नाही. सेंट्रल रेल्वेच्या नकाशावरील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून कुर्डुवाडीची नोंद आहे. येथील रेल्वे कारखान्याला गेल्या काही वर्षांत मिळणारे काम तुलनेने कमी होते; त्यामुळे कामगार संख्या वाढली नाही. आता काम वाढत असल्याचे सकारात्मक चित्र असून, कामगारांच्या संख्येतही हळूहळू वाढ होऊ लागल्याने समाधानाचे चित्र आहे. रेल्वे कारखान्यातील काम वाढविण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आग्रही भूमिका घेण्याबरोबरच रेल्वे प्रशासनानेही सकारात्मक राहणे आवश्यक आहे.
इंग्रज काळात म्हणजे ब्रिटिशांनी कुर्डुवाडीचे महत्त्व ओळखून येथे देशातील दळणवळण, वाहतुकीला अग्रगण्य स्थान दिले. पूर्वापार चालत आलेल्या पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या भक्तांसाठी तसेच शेजारच्या बार्शी बाजारपेठेसाठी कुर्डूजवळ रेल्वेस्थानक उभारण्यात आले. १८८७ मध्ये बार्शी-कुर्डुवाडी अशी बीएलआर नॅरोगज रेल्वे सुरू झाली. त्यानंतर ती लातूरपर्यंत पुढे नेण्यात आली. साधारणपणे जवळपास ४७ वर्षांनी म्हणजे १९३० मध्ये बीएलआर रेल्वेने कुर्डुवाडीमध्ये नॅरोगेज रेल्वे कारखाना सुरू केला. त्यावेळी इंग्रजांनी स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन काम दिले. नॅरोगेज प्रवासी कोच निर्मिती, वाफेचे इंजिन दुरुस्ती, मालवाहतूक कोच पीओएच यामध्ये या कारखान्याने एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. कारखान्याच्या भरभराटीच्या काळात येथील कामगारांची संख्या सुमारे दीड हजारावर गेली. शहराची आर्थिक उलाढाल वाढली. वेगवेगळे व्यवसाय वाढीस लागले. रेल्वे संबंधित हुंडेकरी, माथाडी कामगार, गाडीवाहक यांची संख्याही वाढली. या सर्वांचा परिणाम म्हणजे येथील बाजारपेठेचा आलेख चढता राहिला. परंतु, त्यानंतर काही वर्षांत देशातील नॅरोगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये होण्यास सुरवात झाली. वाफेच्या इंजिनचे रूपांतर डिझेल इंजिनमध्ये झाले. त्यामुळे ते काम दुसऱ्या ठिकाणी गेले. येथील कारखान्याचा ‘वर्कलोड’ फारच कमी झाला. १९९० नंतर ही संख्या कमी होत २००० नंतर अडीचशेपर्यंत आली. कारखाना बंद पडतो की काय, अशी अवस्था निर्माण झाली. येथील रेल्वे कारखाना बचाव कृती समिती, विविध रेल्वे संघटनांनी लोकसहभाग घेत कारखान्याला ‘वर्कलोड’ मिळण्यासाठी अनेक आंदोलने केली. याला अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनीही पाठिंबा देत सहभाग घेतला.
दरम्यान, वाढलेल्या कामामुळे कामगारांची संख्या थोड्या प्रमाणात वाढली. मालवाहतुकीच्या डब्यांचे पीओएचचे मोठे काम मिळाले. या कारखान्यात सुमारे ८०० कामगारांची मान्यता असल्याचे सांगितले जाते. ही भरती होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून वर्षापूर्वीच सांगितले गेले; परंतु अद्याप ती प्रक्रिया रखडलेली आहे. परिसराचा आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक विकास होण्यासाठी रेल्वे कारखान्यात प्रवासी कोचसह इतर कामे मिळणे आवश्यक आहे व कर्मचारी भरती लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
फोकस...
- २०१२ व २०१६ मध्ये अनुक्रमे सुमारे ३० कोटी व ६० कोटींचा निधी
- नवीन मोठे कव्हरशेड, अत्याधुनिक यंत्रे बसवत कारखान्याचे नूतनीकरण
- सध्या कारखान्यात ८० मालवाहतूक डब्यांचे पीओएचचे काम सुरू
- लवकरच १२० डब्यांच्या पीओएचचे काम सुरू करण्यात येणार
- एकूण ८०० कामगारांची मान्यता; सध्या फक्त ३१४ कर्मचारी कार्यरत
विशेष प्रवासी कोचची निर्मिती
कुर्डुवाडी येथील रेल्वे कारखान्यात नेरळ-माथेरान येथे आवश्यक असणाऱ्या विशेष प्रवासी कोचची निर्मिती केली जाते. या कारखान्यात कामगारांनी कौशल्यपूर्ण काम करत नेरळ-माथेरानसाठी विशेष कोच, विस्टाडोम, प्रथमश्रेणी कोच तयार केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले होते. कारखान्याला नेरळ-माथेरानसाठी आणखी नऊ कोच निर्मितीचे काम देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.