सोलापूर : महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहकार चळवळीचा मोठा वाटा राहिला आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांनी सहकार चळवळीत योगदान दिले आहे. ही सहकार चळवळ अधिक गतिमान व समृद्ध करण्याची संधी मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारने दिली आहे.
राज्यातील सहकार चळवळ अधिक व्यापक अन्गतिमान करण्यासाठी माझा प्रयत्न राहील, अशी माहिती राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली. अध्यक्ष पाटील यांनी शुक्रवारी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर त्यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, जिल्हा गटसचिव संघटनेचे नेते नारायण गुंड आदी उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, की मोहोळ विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये पुनर्रचित व अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. तेव्हापासून मी राजकीयदृष्ट्या सुशिक्षित बेकार होतो. या पदाच्या माध्यमातून माझे पुर्नवर्सन झाले आहे.
ज्यांनी सहकारी साखर कारखाना खासगी केला अशा व्यक्तीला राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती दिल्याची टीका झाली होती. या टीकेला उत्तर देताना माजी आमदार पाटील म्हणाले, लोकनेते सहकारी साखर कारखाना मी खासगी केला नाही तर कारखान्याच्या दहा हजार ५५३ सभासदांनी ठराव करून केला आहे. कारखान्याच्या सभासदांचे सर्व अधिकार अबाधित आहेत. ते इक्विटी मेंबर आहेत, त्यामुळे सभासदांचे हित साधले गेल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
आमच्या निर्णयाला पक्षाचा पाठिंबा मिळेल
मोहोळ विधानसभा मतदारसंघात आमदार यशवंत माने यांनी सुमारे ३ हजार कोटींची कामे केली आहेत. निवडणूक लढविणे सोपे नाही. पण, चांगला उमेदवार आवश्यक असतो. आमदार यशवंत माने हेच चांगले उमेदवार आहेत. मोहोळमध्ये झालेल्या मेळाव्यात नाव जाहीर करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकार नाही परंतु पक्ष चारित्र्यशील उमेदवाराच्या पाठीशी राहील, अशी मला खात्री असल्याचेही अध्यक्ष श्री. पाटील यांनी सांगितले.
अपर तहसीलमध्ये स्वार्थ नाही
अनगर अपर तहसील कार्यालयास मोहोळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याबाबत राजन पाटील म्हणाले, अनगरला अपर तहसील कार्यालय होण्यात माझा काहीही स्वार्थ नाही. तहसील कार्यालय मोहोळ येथेच आहे. ते कुठेही हलवले नाही. भौगोलिकदृष्ट्या लोकांच्या सोयीसाठी अनगर येथे अपर तहसील कार्यालय करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळला होता. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पुन्हा मतदारांसमोर जात आहोत, त्या वेळी लोक आम्हाला स्वीकारतील, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.