मळेगाव परिसरात परतीच्या पावसाचे धुमशान; शेतकऱ्यांच्या अश्रूंचा फुटला बांध

The return rains in Malegaon have damaged the fields of the farmers
The return rains in Malegaon have damaged the fields of the farmers
Updated on

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील मळेगाव परिसरात परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. सलग आठ ते दहा तास झालेल्या पावसात शेतीचे, पिकांचे, घरांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मळेगाव, हिंगणी, ढाळे पिंपळगाव, पिंपर(सा), उपळे, महागाव, जामगाव, पिंपरी (आर), झाडी, कापसी, सावरगाव, भातंबरे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे व वाऱ्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होऊन शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ढाळे पिंपळगांव प्रकल्प व हिंगणी प्रकल्प परिसरात झालेल्या अतिवृष्टीत ओढे, नाले तुडूंब भरून भोगावती व निलकंठा नदीला महापूर आला आहे. पिंपरी, साकत, उपळे येथील घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पुराच्या पाण्यात  शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी वाहून गेल्या. झाकून ठेवलेलं सोयाबिन कागदाच्या होडीप्रमाणे पाण्याबरोबर वाहून गेले. शेतातील सोयाबिन पाण्यात भिजून त्यास कोंब फुटले आहेत. पावसाच्या व वाऱ्याच्या  तडाख्यात ऊस भुईसपाट झाला. चिखलात कांद्याचा रेंदा झाला तर अनेकांच्या द्राक्ष बागेत गुडगाभर पाणी साचले.

भोगावती नदीने धोक्याची पातळी ओलांडत रौद्र रूप धारण करीत पिंपरी गावच्या वेशीतून गावात प्रवेश केला. अगोदरच गावाचा संपर्क तुटल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी धोका टाळण्यासाठी संपूर्ण रात्र जागून काढली. भोगावती नदीवरील हिंगणी-वैरागला जोडणारा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. तसेच पिंपरी गावचे ग्रामदैवत असणाऱ्या ईश्वर मंदिराचा कळस वाहून गेला आहे. हिंगणी, पिंपरी, साकत येथील पूल पाण्याखाली गेल्याने गावचा संपर्क तुटला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून अर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून येत आहे.

पिंपरी (सा)चे शेतकरी हनुमंत काटमोरे म्हणाले, मंगळवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी जाऊन संसार उघड्यावर आला आहे. भोगावती नदीला महापूर आल्याने पिंपरी, हिंगणी गावचा संपर्क तुटला असून नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घेत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.