राज्यात अपघाती जिल्ह्यांच्या यादीत टॉपटेनमध्ये असलेल्या सोलापूर शहर-ग्रामीणमधील अपघात मागील तीन वर्षांत 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात त्यांना यश आले.
सोलापूर: 1 ऑक्टोबर 1985 रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून परिवहन विभागात नोकरीला सुरुवात करून कर्तृत्वाच्या जोरावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांपर्यंत पोहचलेले संजय डोळे हे आज (गुरुवारी) सेवानिवृत्त होत आहेत. शिस्तबध्द वाहतूक व्यवस्था, विनाअपघात प्रवास, सर्वसामान्यांच्या गरजेला मदत करण्याची त्यांची भूमिका वाहनचालकांच्या स्मरणात राहिली.
राज्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची प्रत्येक वाहनधारकाला धास्ती असते. परंतु, मूळचे पिळोदा (ता. यावल, जि. जळगाव) येथील संजय डोळे यांनी सुरवातीपासूनच प्रामाणिक काम केले. 1985 मध्ये सहायक वाहन निरीक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर तीन वर्षांनी त्यांना मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. कल्याण, धुळे, ठाणे, अंधेरी (मुंबई), उस्मानाबाद, नाशिक, नवी मुंबई आणि आता सोलापूर अशा ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून वाहतूक सुरळीत करणे, त्यांना शिस्त लावण्याचे काम केले. रिक्षा चालकांच्या व्यथांवर मार्ग काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. तर राज्यात अपघाती जिल्ह्यांच्या यादीत टॉपटेनमध्ये असलेल्या सोलापूर शहर-ग्रामीणमधील अपघात मागील तीन वर्षांत 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात त्यांना यश आले.
सोलापूर उपप्रादेशिक कार्यालयात त्यांनी डॉक्टरांची नोंदणी सुरू केली. आतापर्यंत 15 डॉक्टरांची नोंदणी झाली असून सोलापूर जिल्हा राज्यात या प्रणालीत आघाडीवर आहे. त्या डॉक्टरांकडून व्यावसायिक लायसन्स आणि 40 वर्षांवरील व्यक्तीला लायसन्स काढताना लागणारे मेडिकल सर्टिफिकेट ऑनलाइन दिले जाते. त्यासाठी वाहनधारकांना ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. तसेच नवीन वाहन कार्यालयात न आणता ऑनलाइन प्रणालीतूनच त्यांची नोंदणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोना काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी लर्निंग लायसन्स व ड्रायव्हिंग लायसन्सकरीता येणाऱ्या प्रत्येकांची कोरोना टेस्ट केली. त्यातून कोरोना रोखण्यात यश मिळाले. अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या आदल्यादिवशी कौतुक केले. आज (गुरुवारी) त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्ताने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
नाशिक बॉम्बस्फोटाच्या कटातील आरोपी पकडला
नाशिकमध्ये कार्यरत असताना नाशिकमधील विजयानंद सिनेमा थिएटर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा कट रचण्यात आला. त्यामध्ये 'ए' ग्रेडचा अतिरेकी जगजितसिंग उर्फ बिट्टा याला मोठ्या कर्तबगारीने आणि शिताफीने पकडून देण्यात संजय डोळे यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन तत्कालीन पोलिस उपअधिक्षक किरण शेलार यांनी त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविला. त्यांचा पोलिस अधीक्षकांनी गौरवही केला. तसेच नाशिकमध्ये काम करताना त्यांनी 'एका तासांत लर्निंग लायसन्स' हा उपक्रम राबविला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.