हे आजोबा आपले नाव विनायक पाटील असे सांगत आहेत, मात्र स्वतःचे गाव ते सांगत नाहीत. कातेवाडी (ता. मोहोळ) येथून तीन- चार दिवसांपूर्वी ते येथे आले आहेत.
वाळूज (सोलापूर) : विनायक पाटील या नावाचे आजोबा आपले नाव सांगत आहेत, मात्र स्वतःचे गाव ते सांगत नाहीत. कातेवाडी (ता. मोहोळ) (Mohol Taluka) येथून तीन- चार दिवसांपूर्वी सय्यद वरवडे (Sayyad Warwade) येथे आले आहेत. मात्र ते कातेवाडीचे नाहीत. त्यांना नीट चालता येत नाही. घरापासून दुरावलेल्या आणि भुकेलेल्या या आजोबांना सय्यद वरवडे (ता. मोहोळ) शाळेतील मुली दररोज आपल्या डब्यातील जेवण देत आहेत. शिक्षणाचे धडे गिरवता- गिरवता भूतदया आणि परोपकाराचे धडे येथील जीवन शिक्षण मंदिरात दिले जात आहेत.
सध्या कोविडमुळे शाळा बंद आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या आवाहनाला वडवळ केंद्रासह येथील शिक्षकांनी प्रतिसाद देत शाळेत शाळा बंद, शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी कोविड नियमांचे पालन करून सय्यद वरवडे येथे झाडाखालचे वर्ग भरवले जात आहेत.
इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या सृष्टी विरपे, सृष्टी संतोष गावडे, प्रतीक्षा सुतार, श्रावणी भलभले, दीपाली आठवले, स्वरांजली वाघमोडे या मुली शाळेत येतात. त्यांना बेघर व बेसाहाय्य आजोबा रस्त्याच्या कडेला दिसून आले. हे आजोबा आपले नाव विनायक पाटील असे सांगत आहेत, मात्र स्वतःचे गाव ते सांगत नाहीत. कातेवाडी (ता. मोहोळ) येथून तीन- चार दिवसांपूर्वी ते येथे आले आहेत. मात्र ते कातेवाडीचे नाहीत. त्यांना नीट चालता येत नाही. पोटात अन्न नसल्याने भोवळ येऊन पडत्यामुळे त्यांच्या गुडघ्याला जखम झाली असावी. या शाळेतील छोट्या मुलींना त्या आजोबांची अवस्था पाहून दया आली. त्यांनी याबद्दल वर्गशिक्षिका ज्योती कांबळे यांना सांगितले. यावर शिक्षिकेने, तुमच्या डब्यातील चपाती, भाजी त्यांना द्या, असे सांगितले. गेल्या चार दिवसांपासून या मुली त्या आजोबांना आपल्या डब्यातील चपाती, भाकरी, भाजी आणि पाणी देत आहेत. या चिमुकल्या मुलींची या वयातील समज आणि त्यांच्या कामाचे गटविकासाधिकारी गणेश मोरे, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, विस्ताराधिकारी मल्लिनाथ स्वामी, विकास यादव, केंद्रप्रमुख दिगंबर कटकधोंड, मुख्याध्यापक राजाराम कोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास कदम, उपाध्यक्ष तानाजी माने यांच्यासह सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सय्यद वरवडे शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन भागणार नाही. त्यांना माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, हे सुद्धा शिकवावे लागेल. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हे विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवलं जातं. म्हणून तर पूर्वी शाळांना "जीवन शिक्षण मंदिर' असं नाव होतं.
- राजाराम कोरे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, सय्यद वरवडे, ता. मोहोळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.