सोलापूर : दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा केला जातो. दरवर्षी तो दिवस शाळेत साजरा करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना मिळत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी-आजोबांसोबत घालवतात. खरंतर आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचं नातं फार विलक्षण असतं, खास असतं. आजी-आजोबा हे नातवंडांची पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी-आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणं आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आणि प्रेरणादायी आहे, असे सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
शाळेतील अनुभवासह आजी-आजोबांचे अनुभव, त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्याच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित करुन मुलांशी संवाद, खेळ आणि गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख करण्यासाठी ‘आजी-आजोबा’ दिवस शाळेत साजरा करणं संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचं आहे.
मुलांना शाळेबरोबरच आजी-आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी हा दिवस साजरा होणं आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी तो साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने यावर्षी १० सप्टेंबर २०२३ रोजी ‘आजी-आजोबा’ दिवस आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि शाळास्तरावर त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात यावा. तसेच या प्रस्तावित दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन शाळेला करता आले नाही तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस ‘आजी-आजोबा’ दिवस म्हणून साजरा करावा, असं शासन निर्णयात म्हटले आहे.
आजी-आजोबांसाठी राबवायचे उपक्रम
सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचा परिचय करुन द्यावा.
आजी-आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत.
विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ सुद्धा ठेवण्यास हरकत नाही.
संगीत खुर्चीसारख्या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील.
आजी-आजोबांसोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा.
पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी-आजोबांना बोलवावे. (ही बाब ऐच्छिक असावी)
महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे
शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आजी-आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर कराव्यात.
आजीच्या बटव्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे. झाडे लावणे आणि पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.